डोंबिवली : कल्याण तालुक्यात घेण्यात आलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खोणीच्या निवडणूकीत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. या गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रात एकूण तीन बूथच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी या करिता कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने या भागाला जणू पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
खोणी ग्रामपंचायतीसाठी एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तेथील चार बूथमधून शुक्रवारी दुपारी 1:30 पर्यंत एकूण 55 टक्के मतदान झाल्याची माहीती मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार असल्याने कल्याण तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कल्याण तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणीकडे पहिले जाते. शुक्रवारी तेथील चारही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी लाबंच-लांब रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे महिला मतदारांचा मतदान करण्याकडे जास्त कल असल्याचे तेथे लागलेल्या मतदानांच्या रांगावरून दिसून येत होते.
मतदानासाठी जेष्ठांना वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मतदान करण्यासाठी अपंग व्यक्तींना उचलून मतदान केंद्रात नेले जात होते. दोन्ही पॅनलमधील नेते मंडळी परस्पर लक्ष ठेवून काही गडबड होत नाही ना याची देखरेख करत होते. डोंबिवली शहरातून सर्वपक्षीय नेते मंडळी खोणी गावात मतदानप्रक्रिया चोख पार पडते कि नाही याकडे लक्ष देवून होते.
खोणी ग्रामपंचायत निवडणूक अतिसंवेदनशील गणली गेल्याने मतदान केंद्र व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी जागता पहारा ठेवला होता. गावातील चौका-चौकात पोलीसांचा फौजफाटा जय्यत असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. पूर्वीपासून वादग्रस्त ठरलेल्या खोणी ग्रामपंचात निवडणुकीसाठी डोंबिवली विभागाचे सहाय्क्क पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी निवडणूक केंद्रात प्रत्यक्ष हजेरी लावल्याने खोणी ग्रामपंचायत निवडणूक दिवसभर चर्चेचा विषय ठरली होती