(भाजपा मंडल अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा इशारा)
डोंबिवली : पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार पश्चिम येथील कुंभारखान पाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्मशानभूमीच्या व्यवस्थापनात प्रचंड अनागोंदी माजली आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधांसह सुरक्षा रक्षक तैनात नाही. जबाबदार पालिका अधिकारी नसल्याने काहीही घडू शकते. परिणामी कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत २४ तास कर्मचारी व सुरक्षा रक्षक नियुक्त करून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा द्यायलाच पाहिजेत. जर असे झाले नाही तर नागरिकांच्या वतीने भाजपा तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे.

कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत अनागोंदी कारभाराबाबत मंगळवारी फ प्रभागक्षेत कार्यालयात भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि अनमोल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेऊन त्यांना रीतसर पत्र देण्यात आले. यावेळी संदीप ( रमा ) म्हात्रे, प्रशांत पाटेकर, मनोज वैद्य, विशाल पारखे, जयप्रकाश सावंत, पवन मोरे होते. त्यांनी अनागोंदी कारभारावर जाब विचारून सावंत यांना आंदोलनाचा इशारा दिला.
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथे महानगरपालिकेने अत्याधुनिक ‘मोक्षधाम’ स्मशानभूमी उभारली आहे. तसेच डोंबिवली पूर्वकडील शिव मंदिर येथील स्मशानभूमीचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले होते की डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखान पाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या स्मशानभूमीच्या व्यवस्थापनात प्रचंड अनागोंदी माजली असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कारण सदर स्मशानभूमीत २४ तास उपलब्ध राहतील असे कर्मचारी नाहीत. अलीकडेच
दोन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले असता स्मशानभूमीला कुलूप होते, ज्यामुळे एका कुटुंबाला दुसऱ्या स्मशानभूमीत जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिली आहे.
स्मशानभूमीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे स्मशानभूमीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे, तसेच रात्रीच्या वेळी येथे असुरक्षित वातावरण असते. स्मशानभूमीत पाण्याची तीव्र टंचाई आहे. स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून त्यांची नियमित सफाई केली जात नाही.
स्मशानभूमीत तात्काळ २४ तास चक्राकार पद्धतीने तिन्ही पाळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. परिसराच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करावा. लाकडे वाहण्यासाठी आणि रचण्यासाठी पुरेसे मजूर उपलब्ध करून द्यावेत. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न युद्धपातळीवर सोडवावेत. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील वेळी नागरिकांना अशा अडचणींना सामोरे जावे लागणे हे प्रशासनाचे
अपयश आहे.
तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रिया जोशी यांनी दिला आहे.
