डोंबिवलीत घरगुती गणपतीसाठी शाडूच्या मूर्तीचा आग्रह

डोंबिवली : पर्यावरण संवर्धनाबाबत आता बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झाली आहे. डोंबिवलीत घरगुती गणपतीसाठी शाडूच्या मूर्तीचा आग्रह डोंबिवलीकरांकडून होत आहे. येथील गोडसे कला केंद्र गेली 120 वर्षे शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करीत आहेत. गोडसे कला केंद्रातून दरवर्षी हजारो गणपतींची निर्मिती होते असून बहुतांश गणेश मूर्ती शाडुच्याच मातीच्या असतात. गोडसे कला केंद्र डोंबिवलीतील ब्राह्मण सभेच्या इमारती समोर असून त्यांची चौथी पिढी गणपतीच्या सुबक मुर्ती घडविण्याचे काम करीत आहेत.

याबाबत गोडसे कला केंद्राचे दिलीप गोडसे यांनी सांगितले की, आमची चौथी पिढी गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करीत आहे. शाडूच्या मातीपासून बनविलेल्या मूर्ती हे आमचे वैशिष्ट्य आहे. शाडूच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होत नाही. शाडूची मूर्ती पाण्यात सहज विरघळते. त्यामुळे शाडूच्या मूर्तीला प्रचंड मागणी आहे. शाडूच्या मूर्ती फारशा कुणी तयार करीत नाहीत. शाडूच्या मातीची गोण 250 ते 275 रुपयास आहे. तर प्लास्टरची गोण 150 ते 200 रूपयाला मिळते. प्लास्टरच्या मूर्तीच्या मानाने शाडूच्या मूर्तीची किमंत जास्त आहे. आमच्या घराण्यात शाडूच्या मूर्ती बनविण्याची परंपरा 120 वर्षापासून आम्ही जपत आलो आहोत. कल्याणाच्या कुंभारवाड्यात आमचे वाडवडील या मूर्ती तयार करण्याचे काम करीत असत. आता मात्र यात बाजारीकरण होत चालले आहे. आपल्या मनातील भावना टिकून राहिली पाहिजे. बाजारीकरण न होता त्यातले पावित्र टिकले पाहिजे. गणपतीची मूर्ती तयार करताना साचा न वापरता हाताने माती लिंपून आकार दिला जातो. त्यानंतर मूर्तीचे कोरीवकाम आणि त्यानंतर रंगकाम केले जाते. मुख्य म्हणजे, मूर्तीच्या डोळ्यांची आखणी काम महत्वाचे असते. ते काम करताना एकाग्रता टिकावी म्हणून डोळ्यांची आखणी करतांना वेगवेगळ्या रंगांच्या छटा हाताच्या मुठीवर घेऊन काम सुरु असते असेही गोडसे यांनी पुढे सांगितले.

येथील अनेक गणेश भक्त नोंदणीसाठी गोडसे कला केंद्रात येत असतात. पूर्वेकडील फडके रोडवरील रहिवाशी संजय कर्वे हे शाडूच्या मूर्तीची नोंद करण्यासाठी गोडसे कला केंद्रात आले होते. कर्वे यांचे कुटुंब गेल्या साठ वर्षापासून गोडसे यांच्याकडून शाडूची मूर्ती खरेदी करीत आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात विहिर आहे. या विहिरीत गणपतीचे विसर्जन करतात. हिच शाडूची माती झाडांच्या कुंड्यामध्ये टाकतात.

प्लास्टरची मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग, थर्माकॉलची सजावट प्लास्टिकचे हारतुरे-तोरणं, अशा अनेक वस्तूमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. समुद्र, नदी, विहिरी दूषित झाल्या आहेत. पर्यावरणबाबत जागरुकता झाली असली तरी प्रत्यक्षात हानीकारक वस्तू वापरण्याचा कल बंद झाला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल. यासाठीच शाडूच्या मूर्तीचा आग्रह डोंबिवलीकर गणेश भक्त धरीत आहेत.