डोंबिवली : “दत्तोपंत ठेंगडी द्रष्टा विचारवंत” हे पुस्तक वैचारिक जगात जायला हवे. हा विचारप्रवाह पुढे न्यायला हवा. भारतीय अधिष्ठान असलेला, तिसरा पर्याय मांडणे आवश्यक आहे. या ग्रंथात राष्ट्र काय आहे, कसे बनते याची चर्चा आहे. भारतीय तत्त्वज्ञानात जन, भूमी आणि संस्कृती हे राष्ट्राचे आधार आहेत. जीवन जगण्याची कला, मुल्य ही भारतीय संस्कृती आहे. अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. विविध कला, संगीत, साहित्य, नृत्य, व्यवहार, भाषा पण संस्कृती एक आहे. विविधतेत एकता असं नाही तर एकत्वाचे बहुआयामी रूप आहेत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्ताजी होसबाळे यांनी डोंबिवलीत केले.
डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर शाळेच्या पेंढारकर सभागृहात पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष
मधुकरराव चक्रदेव, भारतीय मजदूर संघ जिल्हाध्यक्षा शोभाताई अंबरकर, भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष सी. के सजीनारायणजी, कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेकराव मोडक आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्येष्ठ प्रचारक व भारतीय मजदूर संघ सहित ३५ संघटनांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या वैचारिक विश्वाचा, सामान्यांना परिचय करून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समिती, ठाणे जिल्हा यांच्या वतीने “दत्तोपंत ठेंगडी द्रष्टा विचारवंत” या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी डोंबिवली झाले त्यावेळी होसबाळे बोलत होते.
यावेळी होसबाळे पुढे म्हणाले, पूजनीय गुरुजींनी डॉ. हेडगेवार यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा विस्तार केला. त्या विचारांचे ते भाष्यकार बनले. स्वतंत्र भारतात साम्यवाद, समाजवाद असे अनेक विचार आले, पण गुरुजींनी हिंदुत्वाच्या मौलिक विचाराला, तर्कशुद्ध पद्धतीने, इतिहासाच्या आधाराने जागृत ठेवले. या विचारांचा विस्तार पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि दत्तोपंत ठेंगडीजींनी केला.
यावेळी कार्यक्रमात सर्व लेखकांचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवास तथा दादा जोशी यांचा सत्कार दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतीय मजदूर संघाचे जिल्हा चिटणीस भरत गोडांबे यांनी केले.