डोंबिवली : गेले अनेक दिवस डोंबिवली व ग्रामीण भागात पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण भागातील दावडी येथील काही रहिवाश्यांनी हंडा- कळसी वाजवून प्रशासनाचा निषेध केला. तर आजदेपाडा येथे पाणी वितरण व्यवस्थेत भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त केली. डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा आणि राजूनगर प्रभागात अनेक दिवसांपासून पाणी टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी सोमवारी डोंबिवलीतील पालिकेच्या`ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपचे माजी नगसेवक विकास म्हात्रे यांनी रहिवाश्यांना घेऊन पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अनिरुद्ध सराफ यांची भेट घेऊन जाब विचारला.
कर भरूनही पाणी मिळत नसल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी भेट घेऊन आपली समस्या मांडली. स्थानीक नगरसेवक म्हात्रे यांनी रहिवाश्यांचे म्हणणे ऐकून अनेक वेळेला पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केला. गेली दोन ते तीन वर्ष सातत्याने लेखी तक्रार केली होती. गरीबाचा वाडा, कुंभारखानपाडा आणि राजुनगर येते अत्यंत कमी दाबाने अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने येथील रहिवाशी पुरते वैतागले आहेत. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जनआंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक म्हात्रे यांनी पालिकेला दिला होता. पालिका प्रशासनाने पाणी प्रश्न सोडविला नसल्याने अखेर माजी माजी नगरसेवक म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी पालिकेच्या डोंबिवलीतील `ह` प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अनिरुद्ध सराफ यांची भेट घेऊन माजी नगरसेवक म्हात्रे यांनी जाब विचारला. तर डोंबिवली पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांचीही भेट घेऊन म्हात्रे यांनी रहिवाश्यांचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी विनंती केली. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सराफ यांनी आपल्या विभागासाठी नवीन जलवाहिनी टाकली असून येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले.