डोंबिवली : शहरातील प्रतिष्ठित केरळीय समाजम मॉडेल कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी ११ जुलै २०२५ रोजी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते भव्य पद्धतीने पार पडले. राज्यपालांनी कॉलेजमधील संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय व जिमखाना यांसारख्या सुविधा पाहून संस्थेचे कौतुक केले. तसेच संस्थेच्या कौशल्याधिष्ठित शिक्षण धोरणाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोव्याचे राज्यपाल डॉ पी एस श्रीधरन पिल्लई मल्याळम भाषेत उपस्थितांशी संवाद साधताना महाविद्यालयाच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी पुढे सांगितले, मल्याळम नागरिक देशाच्या कानाकोपऱ्यात राहतात. महाराष्ट्रात वावरताना तिथल्या संस्कृतीशी जोडून घेताना त्यांनी आपल्या संस्कृतीशी नाळ घटट बांधून ठेवली आहे हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
तर संस्थेचे चेअरमन वर्गीस डॅनियल यांनी सांगितले की, डोंबिवली खंबाळपाडा परिसरात २०१५ साली मॉडेल कॉलेज सुरु करण्यात आले. मात्र वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे महाविद्यालयाचा विस्तार करताना पूर्वी तीन मजल्याची असलेली हि इमारत आता पाच मजल्याची करण्यात आली आहे. या इमारतीत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, कार्यालये, आणि सभागृह तयार करण्यात आले असून अद्ययावत आणी परिपूर्ण इमारतीचे लोकार्पण राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्राचार्य सी. ए. रवींद्र बांबर्डेकर यांनी सांगितले की, कॉलेज लवकरच अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबत रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत. दरवर्षी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी १००% पेक्षा जास्त मागणी असते आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार भविष्यात नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.
या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्या बरोबरच मल्याळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन वर्गीस डॅनियल, अध्यक्ष राधाकृष्णन नायर, उपाध्यक्ष सोमामधू के.एस., उपचेअरमन राजीव कुमार, सेक्रेटरी बिनॉय थॉमस, शैक्षणिक सचिव वेणुगोपाल के., सांस्कृतिक सचिव सुरेशबाबू के.के., खजिनदार मनोजकुमार व्ही.बी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.