( पूर्वीचा 3200 गणेश मुर्ती रेकॉर्ड टप्पा ओलंडला )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या वै. ह. भ. प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) एक भव्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला एकूण 97 शाळांमधील 4657 विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा बाप्पा बनविण्याचा आनंद घेतला. या उपक्रमाच्या रेकॉर्डमुळे सर्वदूर पालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभाग, शिक्षण विभाग, कल्याण डोंबिवली मनपा एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्ती बनविणे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, पालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त वंदना गुळवे, कार्यकारी अभियंता रोहिली लोकरे, सहाय्यक आयुक्त राजेश सावंत, हेमा मुंबरकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शिल्पकार गणेश गजानन अडवळ उपस्थित होते.
शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्ती बनविणे या उपक्रमाला डोंबिवली शहरातील पालिकेच्या सहा व खाजगी 91 एक्याण्णव शाळेतील सुमारे चार हजार सहाशे सत्ताव्वन विद्यार्थ्यांनी बाप्पा बनविण्याचा आनंद घेतला. या उपक्रमासाठी शाडूच्या मातीची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था होती तर खासगी शाळांनी स्वतःच्या बसेसमधून विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मोठ्या सहभागामुळे या उपक्रमाचे ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या उपक्रमाने पूर्वीचा 3200 गणेश मुर्ती रेकॉर्ड टप्पा ओलंडून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
या उपक्रमाबाबत पालिका आयुक्त अभिनव गोयल म्हणाले, शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा बनवणे अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी हा उद्देश या संकल्पनेचा होता. यामधील सहभागी प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या पालकांनाही सांगतील की शाडूच्या मातीचाच गणपती बाप्पा आणू या ! यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याकरता ही कार्यशाळा घेण्यात आली. याचा मनापासून आनंद होत आहे की या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि हा उपक्रम रेकॉर्ड झाला.
या उपक्रमाबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले, शाडूच्या मातीपासून गणपती बनवणे हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचला आहे. पर्यावरणाची हानी होत आहे ती थांबली पाहिजे हा विषय या उपक्रमाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने समोर आणला ही चांगली गोष्ट आहे.
तर याबाबत शिल्पकार गणेश गजानन अडवळ म्हणाले, शिल्पकार असल्याने असं वाटतं की मुलं कधी हातात माती घेतील, पण आज या उपक्रमामुळे मुलांच्या हातात माती आली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव लक्षात घेता निसर्ग, समुद्र, पाणी, झाड हे सर्व आपल्याला सांभाळायचं, वाढवायचं आहे. आपण पीओपीचा राक्षस उभा केला आणि निसर्गाची समृद्धी ढासळली. पण या अशा उपक्रमामुळे साडूच्या मातीचे गणपती बाप्पा आपण बनवत असल्याने आपण आपली संस्कृती रुजूवत आहोत.