डोंबिवली : प्रभागातील विकास कामांसाठी जो निधी देईल त्या पक्षाची साथसंगत करणार अशी री आवडणारे विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे सरते शेवटी शिवसेनेत रविवारी दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भगवा हातात व भगवी शाल पांघरत म्हात्रे दाम्पत्यांना शिवसेनेत समाविष्ट केलं. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले. डोंबिवलीत भाजपात दीपेश म्हात्रे आले तर त्याची परतफेड म्हणून ठाण्यात भाजपाचे विकास म्हात्रे शिवसेनेत आले. यामुळे निवडणुकीच्या आखाड्याला सुरुवात झाल्याची झलक महायुतीत दिसून येत आहे.

यावेळी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या कामांवर प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत.

रविवारी रात्री गंगुबाई संभाजी शिंदे, सामाजिक सभागृह, कोरम मॉल जवळ, ठाणे ( पश्चिम ) येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे, माजी नगरसेवक नंदू धुळे – मालवणकर यांच्यासह भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षता भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
