टीममुळे काम होतं आणि त्या टीमचा कॅप्टन चांगला पाहिजे — आमदार सुभाष भोईर

डोंबिवली : कोणत्याही टीमचा कॅप्टन चांगला असला तरच चांगले काम होते. शिवसेनेचे कॅप्टन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे नेतृत्व चांगले आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जिल्ह्याला मिळाले आहे. त्यांच्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा शिवसेनेने भगवामय करून दाखवला आहे. ग्रामीण विभागात काम होत आहे म्हणूनच सत्ता आहे. कोणीही एकटा कधीही लढाई जिंकत नाही. टीममुळे कामे होत असतात आणि त्यासाठी कॅप्टन चांगला पाहिजे असे वक्तव्य आमदार सुभाष भोईर यांनी केले.

डोंबिवली जवळील खोणी गावातील शिवसेनेच्या शाखेत आमदार सुभाष भोईर यांनी स्वखर्चातून शाखेचे संगणीकृत माध्यमाने शाखा डिजिटल केली. त्या संगणीकृत शाखेचे उद्घाटन भोईर त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख एकनाथ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य किरण ठोंबरे, गणेश ठोंबरे, शाखाप्रमुख गुरुनाथ पाटील, उपशाखाप्रमुख वासुदेव ठोंबरे, विभागप्रमुख नेताजी पाटील, चैनु जाधव, शिवाजी फराड, वासुदेव पाटील आणि उपस्थित होते.

यावेळी भोईर पुढे म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग सुरु झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शाखा सुद्धा डिजिटल व्हायला पाहिजेत. याच उद्देशाने ग्रामीण विभागातील सर्व शाखा संगणीकृत तंत्रज्ञानाने सज्ज केल्या आहेत. हे कार्य करतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतरच सात शाखा डिजिटल होत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली खोणी शाखा पूर्णपणे संगणीकृत होत असून आता सैनिकांना आणि खोणी गावातील ग्रामस्थांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

खोणी गावाचं वैशिष्ट्य म्हणेज गावात कोणताही कार्यक्रम असेल तर तो हौशीने आणि जिद्धीने केला जातो. संगणकाच्या माध्यमातून सर्व शाखा जोडल्या जात आहेत. शिवसेनेच्या खंबीर नेतृत्वामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही जागा मोठ्या फरकाने शिवसेनेने निवडून आणल्या त्याला येथील सैनिकांची मोठी साथ मिळाली. कामे कशी करायची हे आम्हाला चांगलेच माहित आहे. नाबार्डकडूनही वडवली पुलाच्या विकास कामासाठी दीड कोटी निधी मिळाला आहे. अनेक विकासाची कामे ग्रामीण विभागात होत असून त्या कामांचे लोकार्पण झाले आहे. सर्वांनी मिळून कोणतेही काम केलं तर त्याच्यात आनंद असतो. काम करण्यासाठी कर्तुत्व असायला लागत नुसत देवाचं नांव असून चालत नाही असा टोलाही त्यांनी स्थानिक विरोधकांना लगावला.