कोपरगांव येथे शिधापत्रिका माहितीच्या भव्य शिबिराचे आयोजन

डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भगवा पंधरवडा उपक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. शिवसेना पश्चिम शहर संघटक तथा माजी नगरसेवक संजय पावशे यांनी नुकतंच कोपरगाव येथे शिधापत्रिका माहितीच्या भव्य शिबिराचे आयोजन केले याचा फायदा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.

या शिबिराचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीचे विद्यमान सभापती मनोज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिधावाटप अधिकारी धनराज जाधव, शाखाप्रमुख सुभाष गायकवाड, तानाजी बद्रुक, शिधावाटप कर्मचारी बालाजी देशमुख, जयश्री नाईक यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.

यावेळी धनराज जाधव म्हणाले, शिधापत्रिकाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. एकाच ठिकाणी असे शिबीर असल्याने त्या तात्काळ सोडविता येणे सुलभ होते. विशेष म्हणजे स्वसाक्षरी माध्यमातून अल्प उत्पन्न हमी पत्राद्वारे नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करून नवीन शिधापत्रिका मिळेल. तसेच शिधापत्रिकेत नांव कमी करणे तसेच वाढविणे यासाठीची अर्ज करता येतो. या शिबिरात शिधापत्रिका व आधारकार्ड लिंक करता येईल असेही त्यांनी पुढे सांगितले.

तर आयोजक पावशे म्हणाले, शिधाकार्यालयात नवीन शिधापत्रिका देणे तसेच खराब, फाटलेली, जीर्ण शिधापत्रिका देणे, नाव कमी करणे व वाढविणे, यासाठी कालावधी ठरवून दिलेला असतांनाही त्या मर्यादेत शिधापत्रिका न देण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच संयुक्त कुटुंबाला विभक्त शिधापत्रिका देण्यात देखील असाच प्रकार घडतो आहे. यामुळे अशा प्रकारचे शिबीर आयोजित केले. शिबिराच्या माध्यमातून असा उपक्रम केल्यास नागरिकांना लवकर शिधापत्रिका मिळेल आणि यामुळे वेळेची बचत होईल.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रकाश आंबेरकर, शशिकांत देसाई, दिलीप गीते, विश्वनाथ पवार, राजेंद्र गवाणकर, प्रीती देसाई, सुजाता तांबे, ज्योती म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.