डोंबिवली : महाविकास आघाडी सरकारला निश्चित धोरण नसल्याने सर्वच बाबतीत राज्य पिछाडीवर जात आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील निर्णयांची डोलायमान स्थिती आणि आता ऐन दिवाळीत एस.टी. कामगारांना पगार नाही ही गोष्ट शर्मनाक आहे. सरकारने तात्काळ एस.टी. कामगारांना पगार दिला पाहिजे आंदोलन करण्याची वाट काय पाहता असा टोला महाविकास आघाडी सरकारला हाणला. डोंबिवलीत अमृत योजने अंतर्गत विकास कामाच्या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 84 आजदे गावं येथे प्रधानमंत्री अमृत योजने अंतर्गत आजदे गांव आणि परिसरासाठी 9 लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन सोहळा भाजपा आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक विनोद काळण, नगरसेवक साई शेलार, योगेश तळेकर, शेखर शिंदे, अश्विनी विनोद काळण, विवेक पोरजी आदी उपस्थित होते.
एस.टी. कामगारांना शासनाच्या माध्यमातून पगार दिला जातो, त्यांनी तशी तरतूद करून ठेवली पाहिजे. दिवाळी जवळ आली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पगार न मिळणे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रासदायक आहे. वेळीच याबाबत सरकारने निश्चित भूमिका ठेऊन कामगारांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. तर अमृत योजने अंतर्गत होणाऱ्या पाण्याच्या टाकीमुळे येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. आज काही तास पाणी मिळत असल्याने पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी मागणी केली होती ती पूर्ण होत आहे असे नगरसेवक विनोद काळण यांनी सांगितले