मुंबईतील `लाईफ लाइन’ उपनगरीय रेल्वेप्रवासी वाहतूक सर्वांसाठी सुरु करा

डोंबिवली : कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून सामान्य प्रवाश्यांना अद्याप रेल्वे प्रवास बंद करण्यात आला आहे. परंतु लग्न समारंभ, भाजीमार्केट, बसवाहतूक, निवडणूक कार्यक्रम दरम्यान लोकांची गर्दी हमखास दिसून येते. दिल्लीत तसेच इतर राज्यात शेतकरी लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. या सर्वांमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही का ? कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रवासी आपली काळजी घेण्यास सक्षम आहे. कोरोनामुळे बेकारीला सर्वसामान्य नागरिकाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने आता तरी मुंबईतील `लाईफ लाइन’ असलेली उपनगरीय रेल्वे प्रवासी वाहतूक सर्वांसाठी सुरु करा अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे ‘प्रवासी दिनाचे’ औचित्य साधून केली असल्याची माहिती लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉ. काळू कोमासकर यांनी दिली.

‘बिगीन अगेन’ घोषणेनंतर कोरोनाकाळात सरकारी नोकरदारांना वेतन आणि सुखकर प्रवासाची खात्री शासनाने दिल्यामुळे त्यांना अडी-अडचणी आल्या नाहीत. परंतु खाजगी आणि असंघटीत कामगारवर्गाला गेले 10 महिने झगडावे लागत आहे. काहींच्या नोकऱ्याही गेल्या परंतु त्याही परिस्थितीत उभारी घेऊन कुटुंबाच्या पोटासाठी मिळेल ते काम करण्यासाठी घराबाहेर पडला. पण यासाठी त्याला दिवसाचे 18 तास राबावे लागत आहे. रोज प्रवासात 8 तास खर्ची होत आहेत.

डोंबिवलीतून ठाणे, दादर, मंत्रालय मुंबई गाठण्यासाठी प्रवासाची कसरत करावी लागत आहे. रोज लांबच-लांब रांगेत प्रवासात नंबर लागेल याची खात्रीही नसते. सरकार रोज नव्या-नव्या घोषणा करून नागरिकांना फक्त आशेचे किरण दाखावत आहे पण प्रत्यक्षात ठोस भूमिका घेत नसल्याने प्रवाश्यांचे हाल अधिक होत आहेत.

डोंबिवलीत साधा रिक्षाप्रवासही कठीण झाला आहे. वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियंत्रणावर दुर्लक्ष यामुळे सांस्कृतिक डोंबिवलीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक नियंत्रण पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. ठाणे, मुंबईला जाण्यासाठी डोंबिवलीकर प्रवाश्यांसाठी शासनाने बस वाहतूक केली असली तर ती तुटपुंजी आहे. आता सर्वसामान्य जनता कंटाळली असून जर सर्वांसाठी रेल्वे प्रवास खुला केला नाही तर भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता असल्याचेही कॉ. कोमासकर यांनी सांगितले.