डोंबिवली : डोंबिवली पक्षी अभयारण्यात गेले काही महिने निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत कृत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी श्रमदान कार्यक्रम हाती घेतला. सर्वसामान्य नागरिकांना श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत डोंबिवली कल्याण येथून आबालवृद्ध नागरिकांनी रविवारी डोंबिवली पक्षी अभयारण्यात हजेरी लावली.
डोंबिवली पक्षी अभयारण्यमधील वरच्या बंधाऱ्याजवळ रस्त्यालगतच्या ओढ्याच्या बाजूला जंगलातील दगड, माती, पाला – पाचोळा, गवत शाकारून पाणवठ्याचा पृष्ठभागाची मशागत करण्यात आली. पाणी साठवण्यासाठी पारदर्शक प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. साधारण १० फूट लांबीला, ३-४ फूट रुंदीला, १-२ फूट खोली असा बंधारा बांधण्यात आला आहे.
यावेळी एक टीमने बंधाऱ्या जवळच्या परिसरामधील दारूच्या बाटल्या – प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. जमा केलेला सर्व कचरा वरच्या बंधाऱ्यावर जवळ जमा करण्यात आला आहे जो नंतरच्या उपक्रमात रिसायकला देणार आहोत. गौरी कुंड या पाणवठ्या मध्ये साचलेला गाळ आणि कचरा काढण्यात आला त्यामुळे नैसर्गिक झरे मोकळे झाले आणि पाणी वाढले.
वेगवेगळ्या संस्थेच्या एकूण ५० स्वयंसेवकांनी एकत्र मिळून नियोजपूर्वक काम केल्यामुळे हे सर्व शक्य झाले. यामध्ये गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडवेंचर इंडिया, स्वयम् चॅरिटेबल ट्रस्ट, के.वी. पेंढारकर कॉलेज माजी एनसीसी असोसिएशन, निवासी विभाग प्रतिष्ठान, रोटरी क्लब, डोंबिवली मिडटाऊन, ह. ब. प. सावळाराम महाराज वनराई, उंबार्ली ग्रामस्थांची संस्था (नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे गावातील सदस्य), रोटरी क्लब, डोंबिवली सौदामिनी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी, बैकर्स फाउंडेशन, शिवसाधना समूह (डोंबिवली) आदी संस्था तसेच उंबार्ली, सोनारपाडा, दावडी, भाल, धामटन, खोनी आणि निळजे ही डोंबिवली पक्षी अभयारण्य लगतच्या गावातील ग्रामस्थ आणि डोंबिवली, कल्याण , ठाणे, कळवा आणि भिवंडी या शहरातून अनेक स्वयंसेवक या उपक्रमामध्ये सहभागी होते.
