डोंबिवली : अनेक कारणांमुळे मुले-मुली बेपत्ता होत असून पोलीस यामधील अनेकांना शोधून पालकांच्या ताब्यात देतात. अशा प्रकारात डोंबिवली शहरात मागील दीड वर्षात १४८ मुलेमुली बेपत्ता झाल्याची नोंद असून यामधील ९३ अल्पवयीन तर ५५ मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मेहनत घेऊन एकूण १३८ मुला-मुलींचा शोध लावला असून अद्याप १० जणांचा शोध सुरु आहे. परंतु यामध्ये कुठलाही लव्ह जिहादचा प्रकार नाही.
डोंबिवली शहरात रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर, मानपाडा अशी चार पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्यात दीड वर्षात एकूण १४८ बेपत्ता मुलांची नोंद झाली आहे. यात ९३ मुली आणि ५५ मुले असून यातील १३८ प्रकरण उघडलीस आणण्यास पोलिसांना यश आले. तर १० प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना कुराडे म्हणाले, पालकांना आपल्या पाल्यांशी मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे. या वयोगटातील मुला-मुलीना समुपदेशनाची आवश्यक असते. आपली मुले कोणाशी मैत्री करतात, कोणाशी जास्त बोलतात, त्यांचा मोबाईल चेक करा असे कुराडे यांनी सांगितले. १८ वर्षांच्या आतील मुलगा अथवा मुलगी बेपत्ता झाली अथवा पळवून नेले तर स्थानिक पोलिस अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू करतात.