डोंबिवली : मौज, मजा, धम्माल मस्ती यासह आणखी बरंच काही अनुभवत मुलांनी किलबिल फेस्टीव्हलचा आनंद लुटला. कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या किलबिल फेस्टीव्हलला डोंबिवलीकर बालगोपाळांची गर्दी होती.
किलबिल फेस्टीव्हलचे बावन्न चाळीतील रेल्वे मैदानावर आयोजन करण्यात आले होते. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या 11 वर्षापासून या फेस्टीव्हलचे आयोजन केले जात आहे. एक दिवस बच्चे कंपनीसाठी सर्व कार्यक्रम, खेळ आणि खाद्यपदार्थ मोफत ठेवण्यात आले होते. वर्षभरातून एकदा तरी बालगोपाळांसाठी एक मनोरंजनाचा धुमधडाक्यात कार्यक्रम झाला पाहिजे या हेतूने किलबिल फेस्टीव्हलची संकल्पना पुढे आली. डोंबिवली परिसरातील पालक आपल्या मुलांना घेऊन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या महोत्सवात चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर काढणो, कुंभाराच्या चाकावर मातीच्या मडक्यांसह इतर भांडी तयार करणे, वायरपासून खेळणी तयार करणे, तांदळावर नाव कोरणे, आकर्षक मेंहदी काढणे, लाखेपासून बांगडया तयार करणे असे विविध स्टॉल मांडण्यात आले होते. त्यामुळे बच्चे कंपनीनी चित्र काढण्यापासून ते कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी बनविण्याचा आनंद लुटला. येथे जादूच्या प्रयोगांनी मुलांना खळखळून हसविले.

बोलक्या बाहुल्यांचे जनक रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी ‘अर्धवटरावां’सह बालगोपाळांशी संवाद साधून त्यांना खळखळून हसविले. आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम मोहित आणि शौर्य हे भाऊ-बहिण ही महोत्सवात सहभागी झाले होते, त्यांनी गाणी सादर केली. हवेत नृत्यकला सादर करणारी शुटींग स्टार, अल्लाउद्दिनचा जीन, रोली पोली, मिकी माऊस, मिनी, जायंट टेडी बेअर, जायंट पांडा, जोकर छोटया यांनी बालगोपाळांबरोबर धम्माल मौज मजा केली. स्टिक वॉकर आणि मिरर मॅन हे फेस्टीव्हलचे आकर्षण होते. कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायमिंब, सेगवे व्हेईकल्स या कसरतींचे थरार महोत्सवात अनुभवता आला आहे. ट्रम्पोलाईन, रॉक हॅमर ,जम्पिंग सारखे खेळ खेळण्याचा आनंद किलबिल फेस्टीव्हलमध्ये बच्चे कंपनीने घेतला.
यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, प्रत्येक वर्षी कार्यक्रमाची उंची वाढत गेली आहे. यामध्ये सहभागी होणारे स्टॉलधारक त्यांची वेळ ठरवतात, करण त्यांना लहानमुलांना आनंद द्यायचा आहे असे तेच सांगतात. डोंबिवलीतील मुलं ज्यापद्धतीने आनंद घेतात त्याचा आम्हालाही आनंद वाटतो. येथे असणारे सहसी खेळ कुठेतरी रिसॉर्ट मध्ये किंवा कोणत्यातरी क्लब मध्ये ज्यांच्याकडे पैसे असतात त्याच्या मुलांना किंवा पालकांना खेळता येतात. परंतु हे साहसी खेळ ठाकूर आणि सर्व मंडळी आमच्या मैत्री खातर इथे येतात आणि मुलांचे समाधान होईपर्यंत रात्रभर इथेच थांबतात. हे डोंबिवलीचं वेगळं वैभव आहे. किलबिलच वैशिष्ट्य काय तर मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य. प्रत्येक पालक आणि लहान मुलं यांच्या मनावरील अभ्यासाचे किंवा वैयक्तिक असलेले सर्व दडपण दूर करून हसत हसत बाहेर पडतात आणि हेच समाधान पाहण्यासाठी सर्वजण उपस्थित असतो.