डोंबिवली : समाजसेवक तथा कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांनी कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून कोकणचा स्वाद, कोकणचा नाद, कोकणची नाती, कोकणची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. गेली १४ वर्षे अशा पद्धतीने भाई हा उपक्रम करीत असून डोंबिवलीकरांबरोबर कोकणप्रेमींची त्यांना साथ मिळत आहे. शनिवारी या भव्य महोत्सवाचे उदघाटन झाले. बच्चेकंपनीबरोबर पालकांनी या महोत्सवात भेट देऊन एका अनोख्या महोत्सवाची मजा लुटली.

भाई पानवडीकर आणि त्यांचे चिरंजीव स्वप्निल पानवडीकर यांनी कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून या जत्रा महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. या जत्रेत मुलाबाळांसह सर्व कुटूंब जत्रेचा आनंद घेताना दिसून येत आहेत. या भव्य कोकण महोत्सवामुळे खवय्यांना मेजवानीच ठरत आहे. बचत गटातील महिलांचे प्रोडक्ट, महिलांची आभूषणे, कोकणचे खाद्य पदार्थ, कोकणातील सुका मेवा याबरोबर दशावतार नाटक, मॅजीक शो, लावणी, स्थानिक कलाकारांचे नुत्यविष्कार अशी रेलचेल असा महोत्सव आहे. रेल्वे ग्राऊंडवर 22 नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा महोत्सव 8 डिसेंबर पर्यत सुरु राहणार आहे.
कोकण एकता प्रतिष्ठान तर्फे भाई पानवडीकर यांनी आयोजित केलेला हा भव्य कोकण महोत्सव डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदान येथे सुरु आहे. महोत्सवात महिला बचत गटाचे स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत. डोंबिवलीकर या महोत्सवाला भेट देत असून यातून रोजगाराची संधीही मिळत असल्याचे आयोजक पानवडीकर सांगतात. स्थानीक कलाकारांना स्वतःची कला सादर करता यावी याकरता व्यासपीठ दिले जाते. कोकणाचीओळख असलेले दशावतार नाटक आणि डबलवारी सामना हे या महोत्सवातील वैशिष्ट्य आहे. दशावतार नाटक आणि डबलबारी सामना पाहण्यासाठी चाकरमानी आवर्जून येतील असा विश्वास आयोजक व्यक्त करीत आहेत. या शिवाय महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आणि उतुंग झोपाळे मुलांबरोबर मोठ्यांना खुणवत आहेत. दोन आठवडे तरी या उत्सवात सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येईल असे भाई पानवडीकर सांगतात.