डोंबिवली : एकनिष्ठ प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या स्थापनेला चार वर्षे पूर्ण होत असून सकाळपासूनच परिसरात गोविंदा पथकांची मोठी गर्दी होती. दिवसभरात सुमारे ८० ते ९० गोविंदा पथकांनी उत्सवात सहभाग घेतला.
यावर्षीच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सलामीची प्रथा टाळून प्रत्येक गोविंदा पथकाला हंडी फोडण्याची संधी देण्यात आली. दहीहंडी फोडल्यानंतर डोक्यावर दही पडण्याचा आनंद आणि उत्साह प्रत्येक गोविंदाला अनुभवता यावा या उद्देशाने प्रतिष्ठानने ही अभिनव संकल्पना राबविली.

एकनिष्ठ प्रतिष्ठानने सर्व बाळगोपाळ तसेच सहभागी झालेल्या गोविंदा पथकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. हा उत्सव कोणत्याही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय आयोजित करण्यात आला. प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच स्थानिक व्यावसायिकांच्या सहकार्याने उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येकाला हंडी फोडण्याची समान संधी देण्याच्या संकल्पनेचे परिसरातून कौतुक करण्यात आले.
