स्वराज्य दहीकाला उत्सव २०२६ मध्ये नारीशक्तीचा सन्मान

( निर्मल युथ फाऊंडेशन महिला गोविंदांनी फोडली मनाची दहीहंडी, ड्रग्स फ्री इंडिया जनजागृती मोहिमेला प्रारंभ )

डोंबिवली : दिपेश म्हात्रे फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्वराज्य दहीकाला उत्सव २०२६ मध्ये यंदा नारीशक्तीला विशेष मान देण्यात आला आहे. नारीशक्ती सन्मान या उपक्रमांतर्गत दहीहंडी उत्सवातील पहिला मान महिला गोविंदांना देण्यात आला असून निर्मल युथ फाऊंडेशनच्या महिला गोविंदांच्या हस्ते सकाळी दहीहंडी फोडून उत्सवाची सुरुवात झाली.

महिला सक्षमीकरण आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक दहीहंडी उत्सवाला सामाजिक जनजागृतीची जोड देत यंदा ड्रग्स फ्री इंडिया अर्थात अमली पदार्थमुक्त भारत या मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली.

युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ड्रग्स फ्री इंडिया चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून.युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि सशक्त भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे असा संदेश देण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, डोंबिवली शहर हिंदू संस्कृती जपण्याचे काम सातत्याने करत आहे. दीपेश म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून स्वराज्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना नशामुक्त भारत घडविण्याचे आवाहन केले आहे. दहीहंडीला मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित राहत असल्याने या उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत नशामुक्तीचा सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

तर आयोजक तथा भाजपा ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, नारीशक्ती वंदन चा संदेश पुढे नेण्यासाठी यंदा महिला गोविंदांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येत आहे. तसेच नशामुक्त भारत आणि नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेतून युवकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. याच माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने डोंबिवली नशामुक्त मोहिमेलाही प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.