ज्वेलर्सची लूट फसली. नागरिकांनी लुटारूंना झोडपले [ लुटारूंना मोका लावण्याचा पोलिसांचा विचार ]

डोंबिवली : डोंबिवलीच्या गजबजलेल्या मानपाडा रोडवर गुरूवारी रात्री थरारक घटना घडली. दिवसभर गोळा झालेल्या रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यासाठी आलेल्या तिघा लुटारूंचा मनसुबा व्यापाऱ्याच्या प्रतिकारामुळे फसला. लुटारूंनी केलेल्या गोळीबारात व्यापारी थोडक्यात बचावला. एकीकडे लुटारू आणि व्यापाऱ्यात चाललेला थरार पाहून त्याच्या मदतीसाठी आलेल्या संतप्त जमावाने दोघा लुटारूंची यथेच्छ धुलाई केली. मात्र गर्दीचा फायदा घेऊन लुटारूंचा साथीदार पसार होण्यात यशस्वी जाला.

गोपाळ राधेश्याम यादव (21) आणि विकास महेंद्र सिंग (20) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे असून दोघेही मूळचे उत्तरप्रदेश राज्यातल्या जौनपूर जिल्ह्यातील जाफराबाद गावचे रहिवासी आहेत.

डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रोडला गावदेवी मंदिर परिसरात रमेश गोल्ड नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाचे मालक प्रदीप जैन (23) हे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून मॅनेजर केसरसिंग राजपूत याच्यासह दुकानातला माल घेऊन दुचाकीवर घरी निघाले होते. नाना-नानी पार्कसमोरील ते राहत असलेल्या युगंधर सुदामा सोसायटीजवळ येताच दोघे लुटारून रस्ता ओलांडून प्रदीप जैन यांच्या दिशेने धावत आले. एकाने प्रदीप यांच्याकडील काखेत अडकवलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान पाहून प्रदीप यांनी जोरदार प्रतिकार केला. हे पाहून दुसऱ्या लुटारूने त्यांचा डोक्यात लोखंडी फायटरने हल्ला चढविला. या हल्ल्यात प्रदीप यांच्या डोक्यास दुखापत झाली. तरीही होत असलेला प्रतिकार पाहून आणि आपण पकडले जाऊ या भितीने लुटारूने कमरेला खोचलेले पिस्तूल काढून गोळी झाडली. तथापी हुलकावणी दिल्यामुळे व्यापारी प्रदीप आणि त्यांचा मॅनेजर केसरसिंग राजपूत हे दोघेही थोडक्यात बचावले. लुटारूंशी सुरू असलेली झटापट, आरडाओरडा पाहून रस्त्यावर मोठी गर्दी जमली. नागरिकांनी धाव घेऊन दोन्ही लुटारूंना पकडले आणि बेदम ठोकून काढले. हा थरार सुरू असतानाच सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जाधव आणि कॉन्स्टेबल सागर दिवटे यांनी जमावाच्या तावडीतून दोन्ही लुटारूंची सुटका केली. हा सर्व थरार जवळपास पाऊण तास सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिकामी पुंगळी ताब्यात घेतली आहे. तर लुटारूंकडून एक गुप्ती, एक लोखंडी फायटर हस्तगत करण्यात आले आहे. धुमश्चक्री सुरू असतानाच झालेल्या गर्दीमध्ये पिस्तूल कुठेतरी पडून गहाळ झाल्याचे लुटारूंनी पोलिसांना सांगितले.

चौकट : या घटनेनंतर अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर उपस्थित होते. घटनेतील गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे निर्ढावलेले असून पोलीस दप्तरी त्यांच्यावर लुटीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. आरोपींकडून रिकामी पुंगळी, गुचापि आणि लोखंडी फायटर हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता त्यांना मोका लावण्याचा विचार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी सांगितले.