दत्तनगरच्या राजा’ची मैसूर पॅलेस प्रतिकृती ठरतेय आकर्षण

डोंबिवली : डोंबिवलीतील दत्तनगर बाल मित्र मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दत्तनगरचा राजा अशी ओळख असलेल्या या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होत असते. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा असलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी यंदाही परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेली मैसूर पॅलेसची भव्य प्रतिकृती. आकर्षक सजावट आणि देखणे स्वरूप यामुळे ही प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण, तसेच बाप्पाच्या चरणी ११०० पुष्पकमळांचा भक्तिमय अभिषेक यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सर्व समाजातील भाविकांना महाआरतीचा मान देऊन सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जातो.
मंडळाच्या विविध उपक्रमांना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, माजी नगरसेविका भारती मोरे आणि नगरसेवक हर्षल मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी दत्तनगर बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पार्टे, उपाध्यक्ष रमेश घुले, सहसचिव राजू कोटागी, खजिनदार गंगाराम कुराडे आणि सहखजिनदार सुधीर पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.