धोकादायक पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरवात

डोंबिवली : वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर झालेला नेतीवलीचा पत्रीपूल पाडण्याच्या कामाला मंगळवार दुपारपासून सुरवात करण्यात आली. धोकादायक झाल्याने गेल्या महिन्याभरापासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर 20 जुलै रोजी पत्री पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. आयआयटी मुंबई आणि रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये 104 वर्ष जुना असलेला पत्रीपूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी आणि 22 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला.

24 ऑगस्टपासून या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार होती. मात्र मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झालं नसल्याने शिळफाटा-कल्याण-भिवंडी मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला. त्यामुळे मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत पत्री पुलाच्या पाडकामाला स्थगिती मिळाली होती.

आता मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झाल्याने मंगळवारपासून पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली. या पुलावर असणारा डांबरी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडून काढण्यात येत आहे. हा संपूर्ण पूल पाडण्याच्या कामाला सुमारे एक ते दिड महिन्याचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.