वधू-वर महामेळाव्याने समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळते — कल्पना किरतकर

डोंबिवली : विवाह म्हणजे प्रेमाचे बंधन असते, घराचे घरपण असते. विधात्याचे साकार करण्याचे स्वप्न असते. म्हणूनच अशा कार्यक्रमातून समाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचा आनंद होत आहे असे भावनिक वक्तव्य युग फॉउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर यांनी केले.

युग फॉउंडेशन डोंबिवली आणि मंगल मैत्री मैरेज व्हाट्सअप फोरम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बौद्ध वधू-वर महामेळाव्याचे आयोजन रविवारी पूर्वेकडील पी. पी. चेंबर सभागृहात केले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर, बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, माजी नगरसेविका वनिता गोतपगार, अॅड. लिजीनार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कल्पना किरतकर म्हणाल्या, विवाह म्हणजे प्रेमाचे बंधन असते. विवाहामुळे दोन मने एकत्र येऊन पुढील भविष्याची वाटचाल होत असते. मेळाव्यामुळे दोघांनाही परस्पर संवाद साधून एकमेकांविषयीची मते मांडता येतात. मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमातून कोणावरही बंधने लादली जात नाहीत. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी दयानंद किरतकर यांची मोलाची साथ मिळाल्याने हा बौद्ध समाजातील सुशिक्षित तरुण तरूणी, घटस्फोटीत, विधुर, अपंगासाठी मोफत वधू-वर महामेळावा यशस्वी होत आहे.

तर यावेळी दयानंद किरतकर म्हणाले कि, माणसाच्या आयुष्यातील जिथे दोन मने जुळतात तो महत्वाचा टर्निंग पाँईट व घटक म्हणजे विवाह. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आणि नातेवाईकांना लग्न जुळविण्यास कमी वेळ मिळतो. कार्यक्रमातून ज्ञातीबांधवांचे व धम्मबांधवांचा परिचय व सुसंवाद साधला जातो.

कार्यक्रमासाठी राज्यातून मोठ्या संख्येने तरुण – तरुणी आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पराग वाघमारे, मंदार वाघमारे, हेमंत पांगम, सुनिल चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.