डोंबिवली : कादंबरीकार, ललीतलेखन, स्तंभलेखन, कथा, नाटककार शं.ना. नवरे उर्फ ‘शन्ना’ यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘माझ्या आठवणीतले शन्ना आणि त्यांच्या निवडक साहित्याचे वाचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘गुलाम’ या नाटकांच्या उल्लेखाबरोबर त्यांची सोबत, निवडक प्रसंगाचे वर्णन होताना ‘शन्ना’च्या आठवणीने प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
पूर्वेकडील द आर्ट स्टुडिओ येथे ‘शन्ना साहित्यकट्टा’ माध्यमातून २५ सप्टेंबर शन्नाच्या स्मृती प्रित्यर्थ ‘माझ्या आठवणीतले शन्ना आणि त्यांच्या निवडक साहित्याचे वाचन’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाल प्रमुख पाहुण्या म्हणून जान्हवी नवरे ( शन्ना’च्या सुश्ना ) उपस्थित होत्या.
यावेळी जान्हवी नवरे यांनी मनमोकळेपणाने शन्नाच्या आठवणीं आणि शन्नाचे वेगवेगळे स्वभावपैलू, त्यांचा घरातील वावर, गोष्टीव्हेलाळपणा आणि त्यांचे काही किस्से सांगत प्रेक्षकांशी सवांद साधला.
यावेळी शन्नाचे चाहते आरती मुनीश्वर, दिपाली काळे, धनश्री साने यांनी शन्नाच्या साहित्यातील निवडक प्रसंगाचे अभिवाचन केले. शन्नाचे स्नेही मनोज मेहता यांनी शन्नाच्या सोबतीच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नोकरीतून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेतल्यानंतर पूर्ण साहित्याशी ते एकरूप झाले. साहित्याची सेवा करताना त्यातून जे जे आर्थिक उभं राहिल ते त्यांनी सामाजिक कामाला सुपूर्त केलं याचा साक्षीदार मी आहे अशी आठवण मेहता यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शन्नाचा सहवास लाभलेले अनेक रसिक उपस्थित होते. त्यांनीही शन्नांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
कट्ट्या तर्फे कविता, गझल, लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात. नवोदितांना प्रोत्साहन मिळावं याकरिता वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे कट्टा प्रयत्नशील राहणार आहे. तसेच लवकरच शन्नाच्या नावे पुरस्कार देऊन नवोदितांना प्रोत्साहन द्यावे असे अनेक विचार यावेळी व्यक्त करण्यात आल्याची माहिती शन्ना साहित्यकट्टा संस्थापिका नमिता दोंदे यांनी दिली.