डोंबिवली : लहान मुले म्हणजे आपले भविष्य आहे. या भविष्याला आकार देण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लहान मुलांवर फक्त अभ्यास करण्यासाठी दबाव आणण्यापेक्षा त्यांच्या अंगातील कला-गुणांना वाव देण्यासाठी पालकांकडून प्रोत्साहन देण्यात आले पाहिजे व त्यासाठी आमची संस्था सहकार्य करण्यास तयार आहे असे प्रतिपादन ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन कार्यक्रमात इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या मिस इंडिया वैष्णवी दांडेकर यांनी डोंबिवलीत केले.
ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट अंतर्गत डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील लालबहाद्दूर शास्त्री शाळेत लहान मुलांना खाऊ आणि शालेयवस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या मिस वैष्णवी दांडेकर, अमिषा ठक्कर, रिकिता सालियन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कोरोनामूळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लॉकडाऊनचा अनेकांना मोठा फटका बसला असून अनेकांच्या रोजगार आणि व्यवसायांवर गदा आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आणि मिशन बिगीन योजना अंतर्गत सहा महिने उलटले तरीही अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या पार्श्वभूमीवर ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन सामाजिक संघटनेने पुढाकार घेत मंगळवारी अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.
आयरे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमाला इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या मिस टीन इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अस्मि भिडे, मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील मोहिका गद्रे आणि मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अमृता दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती. या सौंदर्यवतींच्या उपस्थितीत आयरे गावातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची आणि मुलांना शालेयोपयोगी वस्तूंची यावेळी मदत करण्यात आली. यावेळी ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या अनुष्का गोसावी, वृंदा पोतदार आणि प्रियांका सोनकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना काळात सर्व मानव जातीला भरपूर काही उमजून आले आहे. एकमेकांना मदत करण्याची धडपड पाहायला मिळाली आहे. आपणही काही तरी केलेच पाहिजे या उक्तीनुसार सामाजिक काम आमच्या ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन माध्यमातून करीत आहोत असे डॉ. स्वरूप पुराणिक यांनी यावेळी सांगितले.
