वृक्षदिंडी माध्यमातून केला कृषिदिन साजरा
डोंबिवली, दि. ३ (प्रतिनिधी) : पर्यावरणामुळे डोके वर काढणारे अनेक प्रश्न सर्वांना डोईजड होत आहेत. जरी आपण कृषी प्रधान देश म्हणून स्वतःची पाठ थोपवून घेत असलो तरी खरी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून येणाऱ्या संकटांना थांबवा असा संदेश अनेक विद्यार्थ्र्यांनी वृक्षदिंडी काढून दिला तसेच अनोख्या वृक्षदिंडीच्या माध्यमातून कृषीदिन साजरा केला.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया, धडपड व्यासपीठ आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून वृक्षदिंडी काढण्यात आली होती. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा असे विविध फलक हाती घेऊन के. रा. कोतकर, टिळकनगर, ओंकार, जोंधळे,डी एन सी, माधवी,सरलाबाई म्हात्रे या सर्व शाळांमधील सुमारे ५५० विद्यार्थी तसेच ४० शिक्षकांनी वृक्षदिंडीत सहभाग घेतला होता. कडोंमपा महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या शुभहस्ते वृक्षदिंडीचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय येथे करण्यात आला होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे सर्व पदाधिकारी, उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष किरण पिंगळे, मुख्याध्यापिका संगीत पाखले, मुख्याध्यापिका रेखा बुचडे, धडधड व्यासपीठ अध्यक्षा रेखा पुणतांबेकर उपस्थित होत्या. यावेळी वृक्षदिंडी कार्यक्रम अध्यक्ष नंदकुमार मालवणकर यांनी अधिकाअधिक वृक्ष लावून जगविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन विध्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना केले.