डोंबिवलीत पुन्हा नाविन्याची झालर:
मराठी मायबोलीसाठी केरलीय समाज सरसावला
डोंबिवली, दि. ३ (प्रतिनिधी) : नवीन परंपरा आणि नव्या संस्कृतीची दखल घेणारे शहर म्हणून पुन्हा एकदा डोंबिवली शहराच्या शिरपेचात एक पुष्प गुंफण्यात आले आहे.
केरलीय समाजातील सदस्यांनी महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषा शिकण्यास सुरुवात करून शहरात एका नवीन संस्कृती मनमिलनाला प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी त्यामुळे मराठी भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनातून सदर मराठी शिकवणी वर्ग सुरु करण्यात आला आहे. या मराठी शिकवणी वर्गाचे उदघाटन शुभंकरोती बिल्डिंग, दुसरा मजल्यावरील केरलीय समाज कार्यालयात नुकतेच मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत आणि क.डों.म.पा. मनसे गटनेते प्रकाश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी भाषा शिकल्यावर विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणींवरसुद्धा मात करता येइल असा विश्वास यावेळी संस्थेच्या विश्वस्तांनी व्यक्त केला. तर सदरचा उपक्रम हा कौतुकास पात्र आहे असे मत गटनेते प्रकाश भोईर यांनी व्यक्त केले. केरलीय समाज संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील गेल्या पन्नास वर्षाच्या योगदानाबद्दल मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी बोलताना गौरव केला. महाराष्ट्रात रहाणाऱ्या प्रत्येक नागरीकाने मराठी भाषा शिकावी असेही मत पुढे व्यक्त केले.
मराठी शिकवणी वर्गात तब्बल ११० जणांनी नोंदणी झाली आहे. हळूहळू ही संख्या वाढेल असा विश्वास यावेळी केरलीय समाजाचे राजेंद्रन नायर यांनी व्यक्त केला. यावेळी नारायण पी., वलसन के., गीता दामोदरन, जयश्री मेनन आणि मराठीच्या शिक्षिका उमा आदि उपस्थित होते.