डोंबिवली, दि. ३० (प्रतिनिधी) : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेवर मुरबाड येथील सेंट्रल रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक गटातुन बाजी मारत आपले वर्चस्व राखून परितोषिकांवर डल्ला मारला. गेली सोळा वर्षे सदर आंतरशालेय स्पर्धा डोंबिवलीत होत आहे. यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांनी रिमझिम पावसाळी वातावरणात मॅरेथॉनचा आनंद घेतला.
या वर्षी स्पर्धा महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात घेण्यात आली. स्पर्धेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी झेंडा दाखवून उदघाटन केले. यावेळी क्रीडाधिकारी मुकणे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, सभागृहनेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, मनसे शहरप्रमुख शशीकांत ठोसर, क्रीडा शिक्षक गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेसाठी आठ गटांची बांधणी करण्यात आली होती. यामध्ये चार मुलींचे तर चार मुलांचे गट होते. मुलांच्या गटामध्ये 3574 तर मुलींच्या गटात 2099 विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मतिमंद व गतीमंद 125 विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला.
मुरबाडच्या सेंट्रल रेल्वे उच्च माध्यमिक शाळेतील वाहिद साबिरअली सलमानी याने 15 ते 18 वयोगटात प्रथम क्रमांक तर आर.टी.बी. हिंदी शाळेतील सुरज मुना विश्वकर्मा यांनी दुसरा क्रमांक पटकावला. मात्र मुरबाडच्या सेंट्रल रेल्वे उच्च माध्यमिक शाळेतील निखिलेश प्रजापती याने तिसरा क्रमांक मिळविण्यात यश प्राप्त केले. तर इतर गटांमधून अस्तित्व, क्षितिज या शाळांतील विद्यार्थ्यांनी मतिमंद गटात पारितोषिके पटकावली. विजयी स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी सायकल, मेडल आणि प्रमाणपत्र तर दुसऱ्या क्रमांकासाठी स्पोटर्स शूज आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पोटर्स बॅग असे पारितोषिक देण्यात आले. या शिवाई बालक मंदिर ट्रस्ट माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला सर्वच शिक्षकवृदांचे आणि इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असे आयोजक शशिकांत ठोसर यांनी सांगितले.