डोंबिवली, दि. ३ (प्रातिनिध) : स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या शासकीय यंत्रणा हवेत असून आता त्यांच्या दुर्लक्षपणाचा आरसा समोर येणार आहे. ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणाऱ्या एकमेव कोपर पुलाला मोठ्या भेगा पडल्याचे उघड होत आहे. संबंधित यंत्रणा मोठा अपघात होण्याची वाट पहात आहे का असा समज डोंबिवलीकरांचा होत आहे.
पाच दशकांपूर्वी डोंबिवली शहर गांव म्हणून ओळखले होते. परंतु स्वस्त घर मिळण्याचे ठिकाण म्हणून डोंबिवली शहराची लोकसंख्या वाढू लागली. परिणामी रेल्वे वाहतुकीला खोळंबा होऊ लागल आणि त्यामुळेच पुढे उड्डाण पुलाचा विचार आला आणि उड्डाण पुलाची निर्मिती झाली. परंतु इंग्रजांनी निर्मिती केलेला भोगदा शंभर वर्षे टिकू शकतो परंतु ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या या उड्डाण पूलाला भेगा पडून त्याची स्थिती धोकादायक होते. पिलर्स आणि सीलिंगला मोठाले क्रॅक पडले आहेत. तर गवताची मोठाली झाड उगवली आहेत. सहा महिन्यापूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालात देखील पुलाची दुरुस्ती आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले असतांनांही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गासह या पुलावरून धावणाऱ्या वाहनांना देखील धोका निर्माण झाला आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ राजाजी पथ-कोपर रोडला जोडणारा मध्य रेल्वे मार्गावरील हा एकमेव
पूल आहे. राजाजी पथावर या पूलाचे खांब आहेत. वाहनांच्या सतत होणाऱ्या वर्दळीमुळे या पुलाची अवस्था खिळखिळी झाली आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल नेहमी हादरत असतो. या पूलाला तडे गेल्याचे सर्वसामान्य लोकांच्या नजरेस आढळून आले. प्रशासन मात्र अत्यंत बेफिकीरपणे याकडे बघत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पूलाच्या खालचे स्टील गंजले आहे. अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या पूलावरुन पूर्व-पश्चिमेला जे-जा करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असते. डोंबिवली शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा राजाजी पथ-कोपर रोड हा एकमेव पूल धोकादायक झाल्याने या पुलाशी संबंधीत वाहनचालकांना देखिल भविष्यात धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ नवीन उड्डाण पुलाची निर्मिती होत असून त्या उड्डाण पुलाचे कामही अगदी धीम्या गतीने सूर आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर काही कालावधीत मोठा धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.