डोंबिवली, १० (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमकडील ५० टक्क्यांहून अधिक गणेश विसर्जन होणाऱ्या मोठा गाव येथील गणेश घाटाची अतिशय दुरवस्था झाली आहे. घाटावरील फरशा निखळलेल्या, सरक्षणासाठी उभारलेल्या लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी उखडून पडल्या असून गणेश घाटावरील कचरा मागील अनेक महिन्यात उचललाच गेलेला नसल्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे गणेश घाटाला गलीच्छ् स्वरूप प्राप्त झाले असून पालिकेचा स्वच्छ डोंबिवली शहराचा नारा कागदावरच उरला आहे.
कल्याणात २७ तर डोंबिवलीत २५ ठिकाणी अशा एकून ५२ नैसर्गिक आणि कृत्रिम तलावावर व पाणवठ्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदा कल्याण पूर्वेतील एक आणि डोंबिवलीतील एक अशा दोन ठिकाणी विसर्जन होणार नसले तरी इतर ५० ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. यातील डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील खाडीवरील गणेश घाटावर डोंबिवली पश्चिमेकडील जास्तीत जास्त गणेश मूर्तीचे विसर्जन दरवर्षी केले जाते. यामुळे या घाटावर पालिका प्रशासनाकडून दरवर्षी विसर्जनासाठी व्यवस्था केली जाते. मात्र विसर्जनानंतर या घाटाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून सध्या या घाटावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचला असून खाडीकिनारी सरक्षणासाठी बसविलेली लोखंडी जाळी उखडून पडली आहे. तर घाटावर बसविलेल्या फरशा देखील अनेक ठिकाणी उखडल्या आहेत. साहजिकच या परिसरात मोठ्या प्रमाणात मात्र गणेश उत्सव १५ दिवसावर आला तरी पालिका प्रशासनाला या घाटाची दुरुस्ती करण्यासाठी मुहूर्त मिळालेला नसल्यामुळे दररोज या घाटावर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या डोंबिवलीकर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनाची हीच का स्वच्छता असा परखड सवाल विचारला आहे. पालिका प्रशासनाकडून खाडीतील भरतीच्या वेळी नदी पात्रातील कचरा खाडी किनारी जमा होत असल्यामुळे या घाटावर कचरा असल्याचे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात हा घाट खाडी किनाऱ्यापासून ३ ते ४ फुट उचीवर असल्यामुळे या घाटावर भरतीचे पाणीच भरत नाही मग कचरा या घाटावर वाहत कसा येईल असा प्रश्न नागरीकाकडून विचारला जात आहे.
अशीच परिस्थिती जुनी डोंबिवली गणेश घाटाची आहे. या गणेश घाटाकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या जवळ-जवळ असणाऱ्या गणेशघाटांची स्थिती भयंकर खराब झाली आहे. याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांना विचारले असता त्यांनी गणेश घाटाची तातडीने गणेश विसर्जनापूर्वी साफसफाई करण्यात येईल असे सांगितले. तर शहर अभियंताकडून या घाटाची पाहणी करून दरवर्षी प्रमाणे विसर्जन व्यवस्थेसाठी वीज, मंडप यासारख्या सोयी सुविधा पुरविल्या जाणार असून त्यावेळी तुटलेले लोखंडी सरक्षण कठडे देखील दुरुस्त केले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.