“दिल्लीचा लाल किल्ला” प्रतीकृती मखराला गणेश भक्तांची मागणी

डोंबिवली, दि. १० (प्रतिनिधी) : थर्मोकॉल मखरांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीतील “वितीन एंटरप्रायजेस” प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “दिल्लीचा लाल किल्ला” प्रतिकृती मखराला गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रभर या मखराला पसंती मिळाली असून यावर्षीचे विषेश आकर्षण ठरत आहे. १५ ऑगस्ट, २०१७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औतीच्य म्हणून “दिल्लीचा लाल किल्ला” प्रतिकृती सजावट पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

“वितीन एंटरप्रायजेस” थर्मोकॉल आणि सनबोर्ड माध्यमातून नक्षीदार कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत. गेली आठ वर्षे मखरांचे प्रदर्शन भरवतात. यावर्षीही पूर्वेकडील मानपाडा रोड येथील शुभांगी दर्शन सभागृहात भव्य प्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे. प्रदर्शनात लामणदिवा, गरुडासन, पाणघोडा, शिवमुद्रा, मयुरासन, दरबार सिंहासन असे विदिध प्रकारची सजावट पाहायला मिळते. विषेश म्हणजे “जयपुरी शिशमहाल” सजावटीत ज्यावेळी गणपतीची स्थापना होईल तेव्हा अनेक प्रतिमा दिसतात. सजावटीमध्ये पूर्ण आरसे बसविण्यात आले आहेत. तसेच “काचेचे मंदिर” सुद्धा आरश्यानी तयार करण्यात आले आहे. मखरांच्या कोरीवकामांसहित “एलईडी” लाईटही बसविण्यात आले आहेत. डोंबिवलीतील निशिकांत मोडक स्वतः नक्षीदार कलाकृती तयार करीत असून आता मोठ्या प्रमाणावर त्यांनी हा लघुउद्योग सूर केल्याने अनेक कलाकारांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

सदर मखरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन “सारेगम”चे प्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात प्राचीन मंदिरे, पर्यावरण विषय, धबधबा, बाळासाहेबांचा हात, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा अशा विविध पद्धतीची मांडणी सजावटीच्या माध्यमातून प्रदर्शनात मांडण्यात आली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.