डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील सुधाश्री सामाजिक बांधिलकी जपणारी संस्थेने दत्तक घेतलेल्या ढवळे पाडा या गावात दिवाळी साजरी करण्यात आली. या निमित्याने सुधाश्रीच्या अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण जिल्हा सरचिटणीस माधुरी जोशी, संस्थेचे कार्यकर्ते बळवंत जोशी, उषा बोरसे, सुभाष परुळेकर हजर होते. यावेळी प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कपडे आणि फराळ देण्यात आला.येथील लहान मुलांना बिस्कीटे देण्यात आली.
रिजन्सी इस्टेट येथील बंगला नंबर १५ – ए ज्ञानेश्वरी कॉ. ऑप. हौ. सोसायटी येथे सुधाश्री ट्रस्ट (नियोजित) सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था कार्यरत आहे. अँड. माधुरी जोशी यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०१५ साली सुरु केलेल्या या संस्थेने वांगणी गावाजवळ आदिवासी समाजातील ३० कुटुंबे राहत असलेल्या ढवळे गाव दत्तक घेतले होते. या गावातील विद्यार्थ्यांना वांगणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी चार किलोमीटर पायी चालत जावे लागते. या गावातील इयत्ता १० वी शिकत असलेल्या पंकज बांगरे, गणपत तिरगुडे, ज्योती ठाकरे, रवी गोसावी, रेणुका बांगारे या पाच विद्यार्थ्यांना सायकली दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अँड. माधुरी जोशी म्हणाल्या, या पाड्यातील कुटुंबियांचा अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. उन्हाळ्यात पाण्याची सोय, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कुटुंबियांना वैद्यकीय सेवा अशी सामाजिक कार्य केली जातात.