डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिक परिक्षेत्रात जुन्या इमारतींसाठी सामुदायिक ”विकास योजना” अंमलात आणावी यासाठी सत्ताधारी व विरोधक शासनाकडे मागणी करीत आहेत. पण लालफितीत अडकल्यामुळे योजनांची अंमलबजावणी होत नाही. ऐंशीच्या दशकातील जुन्या इमारती जिर्ण झाल्या असुन आता त्या मोडकळीस येत आहेत. पालिका प्रशासन अनधिकृत अशी लाल पट्याची पाटी लावून मोकळी होते. पण अशा इमारतींमधील कुटूंबे रस्त्यावर येतात त्यांच काय अशी केविलवाणी ओरड पालिका परिक्षेत्रात होत आहे. पुन्हा एकदा डोंबिवली पश्चिमेत पाच मजली अनधिकृत इमारत खचल्यामुळे ७२ कुटूंबे रस्त्यावर आली आहेत. एका क्षणात आयुष्यभर कमावलेलं सर्व काही खलास झाल याला जबाबदार कोण असे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पश्चिमेकडील जुनी डोंबिवली रोडवरील देवी चौकात असणारी नागुबाई निवास काल रात्री ९.४५ च्या दरम्यान खचली आणि पूर्ण डोंबिवली हादरली. इमारतीचे मालक भरत जोशी असून तळमजला अधिक पाच मजली आरसीसी इमारत १९८३ रोजी बांधण्यात आल्याचे पालिका प्रशासन तर्फे सांगण्यात आले. ‘ह’ प्रभाग क्षेत्र अरूण वानखेडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार “नागुबाई निवास” इमारतीस दोन वर्षांपूर्वी अनधिकृत म्हणून जाहिर करण्यात आले आहे. परंतू इमारत मालक इमारत अनधिकृत नाही असे सांगत आहेत. दोन वर्षांपूर्वी इमारतीची दुरूस्ती करण्यात आली होती. सदर इमारतीमधील तळ मजल्यासहित चौथ्या मजल्यावर प्रत्येकी चौदा कुटूंब रहात असून पावच्या मजल्यावर दोन कुटूंब असे एकूण ७२ कुटूंब आणि इमारतीच्या बाजूला असलेल्या चाळीतील तीन कुटुंब असे एकुण ७५ कुटुंबे आता इमारत खचल्याने रस्त्यावर आली आहेत.
शुक्रवारी रात्री ९.४५ च्या दरम्यान इमारतीमधून तळमजल्यावर खांबाला तडे जात असल्याने तेथील राहणार्या शशी पवार या तरूणांनी निदर्शनास आणून देताच एकच धांदल उडाली. त्यांनी धैर्य दाखवून इमारती मधील सर्व माणसांना बाहेर काढण्याचे धाडस केले. इमारत खचत असल्याची माहिती अग्निशमन दल तसेच पोलिस यंत्रणेला मिळताच अग्निशमनाचे जवान तात्काळ हजर झाले. यावेळी स्थानिक नगरसेविका मनिषा धात्रक आणि नगरसेवक शैलेश धात्रक यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन तेथील नागरिकांना मदतीचा हात दिला. सदर घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देवून पहाणी केली. यावेळी पालिका स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते तथा शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक विश्वनाथ राणे, आरपीआय डोंबिवली शहरप्रमुख अंकूश गायकवाड यांनी बाधित कुटूंबाना धीर दिला. शनिवारी दुपारी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पहाणी केली. नागुबाई निवास मधील दुर्घटनाग्रस्त कुटूंबाना पालिकेकडून भोगवटा धारक असल्याचे दाखले देण्यात आले यासाठी सर्व उपस्थित लोकप्रितधींनी पालिका आयुक्त पी. वेलारासू योग्य माहिती देऊन बाधितांना मदत करण्यात यावी असे सांगितले. ‘ह’प्रभाग क्षेत्र अधिकारी अरूण वानखेडे यांनी याप्रसंगी केलेल्या कामाची दखल महापौर देवळेकर यांनी घेतली. बाधित कुटूंबाना पांडुरंगवाडीतील रात्र निवारा केंद्र, ठाकूर्ली येथील नाना धर्माधिकारी सभागृह आणि पश्मिमेकडील रात्रनिवारा केंद्र येथे तात्पुरती निवासाची सोय करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.