तरुणाई बरोबर आबालवृद्धांची फडके रोडवर हजेरी

डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : चैत्र गुढीपाडवा असो वा दिवाळी डोंबिवलीच्या तरुणाईचं हक्काचं ठिकाण म्हणजे फडके रोड याची प्रचिती आजही पाहायला मिळाली. वर्षोनुवर्षे दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतो पण आता तरुणाबरोबर आबालवृद्धांनीही फडके रोडवर हजेरी लावली.

सकाळी अभ्यंगस्नान करून पारंपरिक वेशभूषेत डोंबिवलीकर तरुणाई फडके रोडवर अवतरली. पुणेरी ढोल, झांजपथकांचा गजर आणि सेल्फीच्या शोधात आणि रमणाऱ्या घोळक्यांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. दिवाळी पहाटची सुरमयी गाणी, नृत्यांचे सादरीकरण आणि रस्त्यांवरील नयनरम्य रांगोळ्या सर्वच लक्ष वेधून घेणार होत. गणेश मंदिरात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी होणारी लगबग आणि नंतर मित्रमैत्रिणीची सेलिब्रेटीच्या सह्यांची धडपड फडके रोडवर होती.

गणेश मंदिर संस्थान माध्यमातून दिवाळी उत्सवाचे औचित्य म्हणून संस्कार भारती तर्फे 10 x 10 फुटाची रांगोळी काढण्यात आली होती. काल यमदीप दान विषयाला धसरून यमाचे आयुध गदा. अशा चार गदा रोंगोळीतून रेखाटण्यात आल्या होत्या. सप्तरंगाच्या रोंगोळीतून संस्कार भारतीच्या कलाकारांनी उमेश पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फडके रोडवर रांगोळ्यांचा पायघड्या घातल्या होत्या.

गणेश मंदिर संस्थान माध्यमातून आप्पा दातार चौकात नृत्याविष्कार सादर करण्यात आला. गायक अभिजित कोसंबी, महेश कोठारे आणि त्यांचे चिरंजीव यांची उपस्थिती म्हत्वातची होती. वक्रतुंड ढोल पथकाने विविध प्रकारे ढोल वादन करून पाहुण्यांचे लक्ष वेधले. स्टार प्रवाह वाहिनीच्या कलाकारांनी “ये ई ओ विठ्ठले” मालिकेचे प्रमोशन केले. तसेच स्थानिक शिवगौरी नृत्यालाय संस्थेच्या कलाकारांनी “महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा नृत्याविष्कार सादर केला. यावेळी गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, प्रवीण दुधे, पदाधिकारी उपस्थित होते. तर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना युवा जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संगीत, नृत्य कार्यक्रम बाजीप्रभू चौक येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचाही डोंबिवलीकरांनी आस्वाद घेतला. शहरात विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे कार्यक्रमात डोंबिबलीकर सहभागी झाले.