ज्वेलर्स गोळीबार प्रकरण : [ शिवसेनेची आक्रमक भूमिका ] पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा — राजेश मोरे

डोंबिवली : भुरटे चोर, खुन, बलात्कार आदी घटनांनी डोंबिवली शहर हादरले असतानाच आता ज्वेलर्स व्यापाऱ्यावर गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेत दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. अशा घटनेमुळे सामान्य डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास शिवसेना आक्रमकपणे आंदोलन करेल असा इशारा डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिला आहे.

पूर्व भागातील मानपाडा रोडवर गावदेवी मंदिर परिसरात रमेश गोल्ड नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. या दुकानाचे मालक रमेश नहार हे गुरुवारी रात्री दुकान बंद करून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत दुकानातला माल घेऊन निघालेल्या प्रदीप जैन या कामगारावर अचानक दोन जणांनी हल्ला केला होता. यावेळी प्रदीपवर गोळीबारही करण्यात आला. मात्र सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. यावेळी झालेल्या झटापटीत ते जखमी झाले. याप्रकरणी टिळकनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवलीत मागील काही दिवसात अशाप्रकारच्या घटना वाढत असून पोलिसांनी या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे. शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या तर्फे आणी शहराच्या प्रथम नागरिक महापौर विनिता राणे याच्यासह शिवसेनेच्या एका शिष्ट मंडळाने सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांना या विषयी निवेदन दिले. यावेळी महापौर विनिता राणे, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, सदानंद थरवळ आदी उपस्थित होते. यावेळी योग्य प्रकारे कारवाई करण्याची मागणी केली असून जर पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने आक्रमण करून आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी सांगितले कि, घटनेनंतर अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर उपस्थित होते. घटनेतील गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे निर्ढावलेले असून पोलीस दप्तरी त्यांच्यावर लुटीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. आरोपींकडून रिकामी पुंगळी, गुचापि आणि लोखंडी फायटर हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता त्यांना मोका लावण्याचा विचार आहे.