शहर व ग्रामीण विभागात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

डोंबिवली : शहर व जवळच्या ग्रामीण विभागातील सरकारी कार्यालये, शाळा, गृह निर्माण संकुले, पक्ष कार्यालये आदि ठिकाणी पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून 72 वा स्वातंत्र्य दिन जल्लोष करीत तमाम नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन केले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या हस्ते डोंबिवली विभागीय कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अग्निशमन दल, सुरक्षा दल, होमगार्ड आणि महापालिकेच्या सर्व उपस्थित आधिकारी वर्गातर्फे तिरंग्यास सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. उपायुक्त सु. रा. पवार, प्रभाग अध्यक्ष, प्रभाग अधिकारी, अभियंते तसेच नगारसेवक, नगरसेविका ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित होते.

डोंबिवली जवळील खोणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषद शाळेत गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून सरपंच हनुमान ठोंबरे व सर्व सदस्यांतर्फे नवीन प्रथा पाडण्यात आली. याच जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन वकिल, इंजिनियर व पदव्युत्तर शिक्षण घेऊन गावाचे नाव मोठे करणाऱ्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. सर्व मतभेद बाजूला ठेऊन विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याचे आवाहन सरपंच हनुमान ठोंबरे आणि इतर मान्यवरांनी यावेळी केले.

पश्चिमकडील एव्हरेस्ट सोसायटीच्या पटांगणात जेष्ठ नगरसेवक शैलेष धात्रक व नगरसेविका मनीषा धात्रक यानी स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन सोहळा कार्यक्रमात जेष्ठ नागरिक व लहान मुलांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी पश्चिम डोंबिवली स्वच्छ-सुंदर व विकसित करण्यावर लक्ष केंद्रित असल्याचे धात्रक यांनी सांगितले. तर महाराष्ट्रनगर येथील बसपा कार्यालयात प्रदेश सचीव दयानंद किरतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

डोंबिवली  रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र जनरल मजदुर संघटने तर्फे झेंडावंदन करण्यात आले असून यावेळी शेकडो नाकाकामगार उपस्थित होते. सर्वसामान्य कारागीर, पेंटर, प्लंबर, घरकाम करणाऱ्या महिला आणि मजूरांची वस्ती असलेल्या डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथे कष्टकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी सैनिक आणि शेतकऱ्यांना साथ देण्याची शपथ घेतली. यावेळी माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक साई शेलार यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते सिद्धार्थ शेलार, भाजपाचे झोपडपट्टी महासंघाचे डोंबिवली शहराध्यक्ष दिलीप भंडारी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिवस निमित्त विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आणि मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम दत्तनगर इथे साजरा करण्यात आला. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे ,कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड,शिवसेना पदाधिकारी तसेच महिला आघाडी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.