एक हजार दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम ]

डोंबिवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून एक हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड, कृत्रिम अवयव शस्त्रक्रिया, एल्बो क्रच आदी मदतीचा लाभ मिळणार आहे. रविवार, ३० सप्टेंबर रोजी कल्याण (पूर्व) येथील तिसाई देवी मंदिर मैदान येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांच्या हस्ते मदत साहित्याचे वाटप होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पत्रकार डॉ. उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु त्यांची पुरेशी माहिती नसल्यामुळे तसेच शासकीय पातळीवरील उदासीनतेमुळे या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचत नाहीत. यासाठीच या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थींना व्हावा, या उद्देशाने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी दिव्यांग सहाय्य शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून गरजू लाभार्थींची यादी तयार करण्यात आली. कोणाला कृत्रिम अवयव शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, कोणाला ट्रायसिकल, व्हील चेअरची गरज आहे, कोणाला हिअरिंग एड हवे आहे, कोणाच्या डोळ्यांवर उपचार करावे लागणार आहेत, अशा सर्व तपासण्या करून लाभार्थींची यादी निश्चित करण्यात आली. त्यानुसार मदत साहित्य निश्चित करून त्यासाठीच्या अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खा. डॉ. शिंदे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडे पाठपुरावा करून या निधीला मंजुरी मिळावली आणि मंत्रालयाच्या अखत्यारीतील अलिम्को या कंपनीच्या सहकार्याने येत्या रविवारी, ३० सप्टेंबर रोजी मदत साहित्य वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.