कांचनगौरीच्या पुढाकाराने कोकण महिला पतपेढीच्या फेडरेशनची स्थापना

डोंबिवली : रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सहकार खाते यांच्या नवीन धोरणाच्या जाचक अटींतून मार्ग काढण्यासाठी कोकण महिला सहकारी पतपेढींच्या फेडरेशनची स्थापना करण्यात आली. डोंबिवलीतील कांचनगौरी महिला सहकरी पतपेढीने याबाबत पुढाकार घेतला होता. कोकणातील सुमारे 90 महिला पतपेढींच्या संचालकांना कांचनगौरी तर्फे प्रशिक्षणाचे धडे दिले जात असल्याची माहिती कांचनगौरीच्या अध्यक्षा उर्मिला प्रभूघाटे यांनी दिली.

पूर्वेकडील रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स मधील कांचनगौरी सहकारी पतपेढीच्या विभागीय कार्यालात डोंबिवली पत्रकार संघातर्फे वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रभूघाटे बोलत होत्या. यावेळी पतपेढीच्या संचालिका संगीता ताम्हणकर, संगीता फाटक, व्यवस्थापक विश्वास बिडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोत्स्ना भावे उपस्थित होते.

यावेळी प्रभूघाटे पुढे म्हणाल्या, बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी रेरा हा कायदा करण्यात आला. मात्र रेरा कायद्यामुळे गरजवंताना घरासाठी कर्ज देणे त्रासदायक ठरत आहे. पतपेढीच्या संगणकात जीएसटी प्रणाली घेतल्याने काम सोपे झाले. पतपेढीसाठी भागप्रमुख ही संकल्पना राबविल्यामुळे कर्जदाराची माहिती मिळवणे, ठेवीदार आणणे, पतपेढीची कामे योग्य प्रकारे होत आहेत. महिला सभासदांचा संक्रांत दानपत्र योजनेत सहभाग मिळत असल्याने दानपत्रातील रक्कम समाज कार्यासाठी खर्ची होते. खेडेगावात संस्कार वर्ग, पुस्तकपेट्या, शाळांना संगणक आदी उपक्रम राबविले जातात. मिनरल वॉटर, कोळंबी उत्पादन, जरबेरा शेती, पोळीभाजी केंद्र, पत्रावळीचे द्रोण आदी उधोगांसाठी कांचनगौरीने कर्ज दिले असून त्याची परतफेडही उत्तम होत असल्याचे प्रभूघाटे यांनी पुढे सांगितले.

महिलांनी महिलांसाठी महिलांद्वारा चालविलेल्या कांचनगौरी सहकारी पतपेढीची स्थापना 2 मे, 1982 रोजी झाली. एकूण सभासद 19180 असून पतपेढीचे भाग भांडवल 5 कोटी 75 लाख 88 हजार रुपये आहे. एकूण ठेवी 147 कोटी 63 लाख 26 हजार असून कर्जे 93 कोटी 40 लाख 53 दिली आहेत. तर 53 कोटी 16 लाख 70 हजाराची गुंतवणूक केली आहे. पारदर्शी कारभारामुळे पतपेढीच्या 12 शाखा, कोअर बँकिंग, बिल पमेंट तत्पर सेवा, विविध कर योजना, ठेव योजनामुळे कांचनगौरीने प्रगती केली आहे.

डोंबिवली पत्रकार संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष विकास काटदरे यांचे उर्मिला प्रभूघाटे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वार्तालाप कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार प्रशांत जोशी यांनी केली तर आभार प्रदर्शन पत्रकार भगवान मंडलिक यांनी केले.