पर्यावरण रक्षणाचा संदेश देत श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल [ पाच लाख मताधिक्क्याने विजयी होणार ]

डोंबिवली : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतानाच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र हजारो कार्यकर्त्यांच्या या शक्तीचा उपयोग पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी करून, वृक्षारोपण करून ठरलेल्या मुहूर्तावर डॉ. शिंदे यांनी अर्ज दाखल केला.

हजारो शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते आणि भीमसैनिकांच्या उपस्थितीत, मोठ्या जल्लोषात डॉ. शिंदे यांनी अर्ज दाखल केला. याप्रसंगी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते रवींद्र चव्हाण, माजी खासदार जगन्नाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, किसन कथोरे, डॉ. बालाजी किणिकर, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, जिल्हाप्रमुख प्रल्हाद जाधव, शहरप्रमुख अंकुश गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, सदानंद थरवळ, भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीचा मानबिंदू असलेल्या, फडके रोड येथील श्री गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील उद्यानात वृक्षारोपण करून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीतही पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा रथ लोकांचे लक्ष वेधून घेत होता. गेली दोन वर्षे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन अंबरनाथ तालुक्यात लोकसहभागातून दीड लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. पर्यावरण हा आपल्यासाठी केवळ बोलण्याचा विषय नसून प्रत्यक्ष कृतीचा आणि जबाबदारीचा विषय आहे असे त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सांगितले. संपूर्ण डोंबिवली शहर भगवेमय झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक निघून शिवघोषाच्या गजरात सावळाराम क्रीडा संकुलात दाखल झाली.

मिरवणुकीदरम्यान महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीतील महिलांचे लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य लक्षवेधी ठरले.

 

चौकट :

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अर्ज दाखल करण्यासाठी शुभमुहूर्त योजिला होता. परंतु निवडणूक कार्यालात गाठण्यासाठी तारेवरची कसतर करावी लागली. पूर्वेकडील संपूर्ण रस्ते गर्दीने तुडुंब भरल्यामुळे पोहोचणे अवघड झाले होते. अखेर भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे यांनी आपल्या मोटारबाईकवर बसवून शिंदे वेगळ्या रस्त्याने निवडणूक कार्यालयात पोहचते केले आणि ठरलेल्या मुहूर्तावर डॉ. शिंदे यांनी अर्ज भरला. महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या महासागरामुळे मंगळवारी वाहतूक कोंडीला सर्वांनाच सामोरे जावे लागले.