डोंबिवली : डोंबिवली शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नावाने कायमच ओरड सुरू आहे. नव्या-नव्या समस्यांनी वीज ग्राहक हैराण झाले आहेत. वीज वारेमाप बिलाच्या धक्क्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता विजेची बिले भरूनही ऑक्टोबर महिन्याच्या कडक उन्हाळ्यात विजेच्या लपांडवाने नागरिक गर्मीने हैराण होत आहेत. वीज वितरणाच्या नव्या फसव्या कारणांनी रोज क्षणाक्षणाला बत्ती गुल होत असल्याने आता तक्रारतरी कोणाकडे करणार अशी विचारणा सामान्य नागरिक करीत आहेत.
पूर्वेकडील औद्योगिक विभागात दरोरोज वीज जाण्याचे प्रकार होत आहेत. गेले दोन दिवस तर वीज आता जाणार नाही ना अशी परिस्थिती तासतासला होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार
डोंबिवली एमआयडीसी निवासी सह आजूबाजूचा काही गावांतील परिसरात काल शुक्रवारी दिवसभर वीज जात येत होती तर आज शनिवारी सकाळी साडे दहा वाजता वीज गेली तरी अद्याप तीन वाजले तरी आली नव्हती. वीज ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात किंवा अधिकाऱ्यांकडे फोन लावले असता ते उचलले किंवा घेतले जात नव्हते. काल शुक्रवारी ट्रान्सफॉरमर, केबल दुरुस्ती करण्याचे असल्याने वीज पुरवठा खंडित केल्याचे समजले तर आज शनिवारी हाय टेंशन वायर जवळ येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वीज पुरवठा बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा बंद करण्याआधी महावितरण कडून प्रत्येक ग्राहकाला त्याचा मोबाईलवर मेसेज दिला जातो पण गेल्या काही दिवसांपासून तसे मेसेज येणे बंद झाले आहेत. सदर प्रकाराने ऑनलाईन घरून काम करणारे नोकरदार व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांना मोठा मनस्ताप, त्रास होत आहे. सोशल मीडिया वर याबाबत महावितरणचा विरोधात अनेकजणांनी आपली मते मांडून नाराजी प्रदर्शित केली आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांनी सांगितले की, दुरुस्तीचे आणि झाडे कटिंगची कामे सुरू असून त्यासाठी शटडाऊन घ्या लागतो. औद्योगिक विभागात वीज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी लिंकलाईन मार्गे नव्या फिडरची व्यवस्था करण्यात आली असून ते काम सुरू असल्याने काही काळ वीज बंद ठेवावी लागत असे परंतु आता सर्व काही सुरळीतपणे नक्की होईल.
