डोंबिवली : आपल्या देशात 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात कर्करोग दिसून येतो. हाच गट कुटुंबासाठी महत्वाचा असतो. जेव्हा 40 ते 60 वयोगटातील कर्करोग रुग्ण आजारी पडतो तेव्हा पूर्ण कुटुंबाची वाताहात होते. देशात 17 ते 18 लाख कर्करोग रुग्ण आहेत. हवेतील प्रदूषण, आर्टिफिशल फूड, चीज यामुळे फॅट वाढते, व्यायामाकडे दुर्लक्ष परिणामी वजन वाढते या बाबी कर्करोग होण्यासाठी आमंत्रण देणाऱ्या आहेत. आता कर्करोग हा आरोग्याचा विषय नाही तर तो सामाजिक विषय आहे असे वक्तव्य कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांनी डोंबिवलीत केले.
कोरोना काळात कर्करोग रूग्णांची झालेली वैद्यकीय होरपळ, आर्थिक कुचंबणा आणि यामुळे कर्करोग रुग्णांची सध्याची परिस्थिती याविषयावर डॉ. अनिल हेरूर बोलत होते.
कोरोना काळात कर्करोग रुग्ण अनेक कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये पोहचू शकले नाहीत. त्या दरम्यान प्रवासाला प्रतिबंध आणि आर्थिक अडचण होती परिणामी औषोधोपचार मिळाले नाहीत. कोरोना काळात कर्करोग बरा झाल्यानंतर तो पुन्हा होण्याचं प्रमाण दिसून आलं. मात्र याची गणना राष्ट्रीय स्तरावर झाली नाही. पण दहा वर्षानंतर पूर्णपणे बरा झालेला कर्करोग रुग्ण पुन्हा कर्करोगाने त्रस्त झाल्याचे दिसून आले. ही बाब कदाचित कोरोनामुळे जी प्रतिकारशक्ती कमी झाली त्याचा परिणाम असू शकतो. कोरोना हा विषय सोडला तर गेल्या पाच वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे.
ज्यांना कर्करोग होता आणि त्यांचे उपचार सुरू होते, त्यांना कोरोना झाला तर त्या परिस्थितीत मृत्यूचे प्रमाण 25 टक्के होते. आता ते प्रमाण कमी होत आहे.
कर्करोग आणि आहार यांचा जवळचा संबंध आहे. आपण काय खातो, काय करतो यावर खूप अवलंबून आहे. आहारात दूध, तेल याचं प्रमाण जास्त असेल तर कर्करोग होण्यासाठी ते कारण ठरतं. स्मोकिंग विचारत घेतले तर 80 टक्के लोकांना कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. तंबाकू, गुटका, तपकिर यामुळे होणाऱ्या कर्करोगाची संख्या जास्त आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कर्करोग प्रमाण जास्त असून ते वाढतच आहे याचं कारण स्मोकिंग आहे. स्त्री शरीरावर स्मोकिंगचे परिणाम अधिक होतं.
कर्करोग हा नशिबाने होत नाही तर तो तुमच्या लाइफस्टाइलमुळे होत असतो. काही प्रमाणात वतावरणामुळे होण्याची दाट शक्यता असते. कर्करोग हा आरोग्याचा विषय नाही तर तो समाज व्यवस्थेचा विषय आहे.
कर्करोगाची दहा लक्षणे :
न भरून येणारी जखम
रक्तस्त्राव होणे
न दुखाणारी गाठ, विशेषतः स्तनामध्ये
अन्न गिळताना होणारा त्रास
मल-मूत्र विसर्जनात बदल
तीळ व चामखीळच्या आकारात बदल
दीर्घकाल खोकला आवाजात बदल
अकराण थकवा, 3 ते 6 महिन्यात अचानक वजनात 10 टक्के व अधिक घट होणे
सतत पोटात वा अस्वस्थ वाटणे
अकारण ताप
स्त्री :
स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग
पुरुष :
तोंडाचा कर्करोग, फुफुसाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग