विधवा महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षण व मशीन वाटप

डोंबिवली : महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग जिल्हा नियोजन समिती ठाणे आणि कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगांव येथील शिवसेना जनसंपर्क शाखेजवळ विधवा महिलांसाठी दहा दिवस मोफत शिलाई प्रशिक्षण आणि मोफत मशीन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 50 विधवा महिलांना पाहुण्यांच्या हस्ते मशीन वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आम्हाला नक्कीच स्वयंरोजगार मिळाले असे प्रशिक्षण घेणाऱ्या विधवा महिलांनी सांगितले.

विधवा महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण व मशीन वाटप या कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक तथा विद्यमान शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेवक तथा कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) अध्यक्ष संजय पावशे, कार्याध्यक्षा अपर्णा पावशे, सचिव सुभाष गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, तालुका संरक्षण अधिकारी निकिता साबळे, जि. म.बा. कार्यालय ठाणे अधिकारी विद्याधर गांवकर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे महेश पाटील म्हणाले, मागील कोरोना परिस्थितीमुळे प्रत्येक कुटुंबासमोर आर्थिक समस्या आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे विधवा महिलांसाठी नवी रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. येथे महिलांनी शिलाई कामाचे प्रशिक्षण घेतले आहे. काही प्रमाणात काम मिळेल आणि त्यांच्या हाती पैसे येईल. हा उपक्रम चांगला असून या उपक्रमामुळे मिळालेल्या संधीचे सोने या महिला नक्कीच करतील असा विश्वास वाटत आहे. महिलांना स्वयंरोजगार मिळाल्याने त्याना आता कुठे दुसरीकडे पायपीट करावी लागणार नाही. नवी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
तर बंडू पाटील म्हणाले, महिला आता थोड्या फार प्रमाणात आपल्या कुटुंबाचा भार पेलू शकतील. तसेच महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.
यावेळी निकिता साबळे म्हणाल्या, प्रशिक्षणात दहा दिवसांच्या प्रशिक्षण देण्यात आले, सुमारे 50 महिलांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षित विधवा महिलांना यावेळी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

बालकल्याण समिती आणि पावशे सर यांनी या उपक्रम माध्यमातून आम्हाला शिलाई प्रशिक्षण आणि त्यानंतर मोफत मशीन वाटप केले त्याचा नक्कीच फायदा होईल असे शिलाई प्रशिक्षण घेणाऱ्या सविता ढाके या विधवा महिलेने सांगितले.