( ८ लाख ६८ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत )
डोंबिवली : शहरात चैन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या तक्रारीत वाढ होत आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीच्या घटना होऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसानी अशाच घटनांचा तपास लावून चोरट्यांना गजाआड केले. चोरटे आरोपी वारिस मिराज खान (२४) आणि मोहम्मद जाफर कुरेशी ( ३०) यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या दोन्ही सराईत चोरट्यांकडून ८ लाख ६८ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.
याबाबत मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्राथमिक शिक्षक रवि सोन्या गवळी, राहणार मानपाडा रोड, डोबिंवली हे मॉर्निंग वॉक करत डी मार्ट समोरील रोडने जात असताना बजाज पल्सर मोटार सायकलवरून जात असलेल्या दोन अनोळखी इसमांनी गवळी यांच्या गळयातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचुन त्यांना जोराचा धक्का देवुन जखमी करून पळुन गेले. गवळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि मानपाडा पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास सुरू करण्यात आला. त्यानुसार

मानपाडा पोलीसांना खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनिय महित्याच्या आधारे तांत्रिक माहीती मिळविली. चैन स्नॅचिंगचे आरोपी नवी मुबंई तळोजा मार्गे डोबिंवलीकडे येत असल्याचे समजल्यावर मानपाडा पोलीसांनी निसर्ग हॉटेल समोरील रोडवर साध्या वेशात तीन ठिकाणी सापळा लावला. तळोजा रोडकडुन आरोपीची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसानी त्यांना जाळ्यात अटकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी वाहने रोडवर थांबवली. या प्रकारचा आरोपींना संशय आला आणि आरोपींनी आपली मोटार सायकल रोडवर टाकून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांचा
हा खेळ हाणून पाडला आणि त्या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले.
चोरटे वारिस मिराज खान हा अटाळी आंबिवली, कल्याण तर मोहम्मद जाफर कुरेशी हा शहाड, कल्याण पूर्व येथे राहतात. चोरट्यांनी कल्याण, कोळसेवाडी व डोबिंवली परिसरात चैन स्नॅचिंगचे एकुण ८ गुन्हे व मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा केल्याची पोलीसांकडे कबुली दिली आहे. या दोन्ही चोरट्यांकडून सर्व गुन्हयामध्ये ८,१८,५००/- रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०,०००/- हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८,६८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.