डोंबिवली : डोंबिवली जवळील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरातील मोठ्या विहिरीत गेले दोन दिवस मृत कासव व मासे दिसून येत आहेत. विहिरीचे पाणीही काळे दिसून येत असून पाण्याला उग्र वास येत आहे. याबतची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्याकडे करणार आहोत अशी माहिती श्री पिंपलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले. मागील महिन्यात प्राचीन मंदिर खिडकाळेश्वर येथील तलावातही मोठ्या प्रमाणावर मृत मासे दिसून आले होते. पाण्यातील प्रदूषणामुळे असे प्रकार होत असल्याचं येथील पदाधिकाऱ्यांच एकमत आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित पिंपळेश्वर महादेव मंदिरात महादेव भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. कल्याण डोंबिवली परिसरातील लाखो भाविक या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसर मोठा आणि निसर्गरम्य असून या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. तसेच मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी मंदिराच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसएससी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचा २७ गावातील हजारो विद्यार्थी लाभ घेत असतात.


गेले दोन दिवस या विहिरीत मासे आणि कासव का मृत होत आहेत, पाणी काळे होऊन दूषित का होते याचा शोध घेण्याचे काम विश्वस्त मंडळ करीत आहे. आजही या विहिरीत मृत कासव व मृत मोठे मासे दिसून आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याचे मंडळाने निश्चित केले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील, सचिव पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, खजिनदार गजानन म्हात्रे, रघुनाथ पाटील, सदस्य सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते. मंडळ पदाधिकऱ्यांच्या मते मंदिर परिसर बाजूला असलेल्या रासायनिक कंपनीच्या प्रदूषणामुळे पाणी दूषित होऊन मासे मृत होत आहेत. हे मंदिर प्राचीन असून पूर्वी याच विहिरीतील पाण्याचा वापर साधू मंडळी, गावकरी आणि भक्तगण पिण्यासाठी करीत असत. पण आता अशा परिस्थिती का होते याचा तपास होणे गरजेचे आहे. जर पाणी दूषित होऊन असा प्रकार होत असेल तर हा विषय चिंतेचा आहे. ही बाब आम्ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. पण कासव व मासे मृत झाले याचे खूप वाईट वाटते असे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले. तसेच काही प्रदूषण करणाऱ्या रासायनिक कंपन्यांची तक्रार प्रदूषण निवारण मंडळाकडे करणार असेही पुढे सांगितले.