कल्याण ते शिळ या रस्त्यास “वै.ह.भ.प. श्री. संत सावळाराम महाराज म्हात्रे नामकरण

( विठ्ठल मंदिरात संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचा जयजयकार )

डोंबिवली : महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णयानुसार मंत्रालयात रविवारी झालेल्या बैठकीमध्ये भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याचा भाग असलेल्या कल्याण ते शिळ या रस्त्यास  वै.ह.भ.प. श्री. संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाच्या या निर्णयमुळे राज्यातील संपुर्ण वारकरीपंथातील सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मंगळवारी विठ्ठल मंदिरात संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचा कीर्तन माध्यमातून जयजयकार करण्यात आला.

डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख तथा वारकरी संप्रदाय निगडित राजेश मोरे आणि वारकरी पंथ कोपरचे अध्यक्ष चेतन महाराज यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडील विठ्ठल मंदिरात कल्याण ते शिळ या रस्त्यास  वै.ह.भ.प. श्री. संत सावळाराम महाराज म्हात्रे असे नामकरण करण्यात आल्याने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी फटाक्यांची आतषबाजी करून वारकऱ्यांनी राम कृष्ण हरी म्हणत एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. उपस्थित वारकरी संप्रदाय सदस्यांनी वै.ह.भ.प. श्री. संत सावळाराम महाराज यांचा कीर्तनाच्या माध्यमातून जागर केला. वारकरी अभंग, दिंड्या म्हणत नाचत-गात तल्लीन झाले होते.

यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, महाराज चेतन ज्ञानेश्वर म्हात्रे, रमेश बुवा पाटील, गुणाजी बुवा मढवी, गोपाळ बुवा पाटील, मोतीराम बुवा म्हात्रे, सुर्यकांत बुवा म्हात्रे, जनार्दन बुवा म्हात्रे, ज्ञानेश्वर बुवा पाटील, संतोष बुवा काळण, संजय बुवा केणे, विजय बुवा सोनावणे, सीताराम बुवा पाटील, गजानन व्यापारी आणि समस्त महिला हरिपाठ मंडळ कोपर आयरे व परिसर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी महाराज चेतन ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. वारकरी संप्रदाय मधील लोकांची मागणी पूर्ण झाली आहे. संतांच्या कार्याला न्याय दिला आहे. संत सावळाराम महाराजांनी आगरी समाजाला हरिपाठ, भागवत, गीता आदी ग्रंथांमधील ज्ञान मिळवून देण्याचं काम केलं. व्यसनमुक्तीचं कार्य त्यांनी समाजासाठी केलं. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि खासदार डॉ. शिंदे साहेब सतत भूमिपुत्रांच्या पाठीशी असतात. येथील मासळी मार्केट आणि वारकरी भुवन आदी विकासकामे पूर्ण होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

तर राजेश मोरे म्हणाले,  संत सावळाराम महाराज हे आमचं दैवत आहे. संतांमुळे समाज चांगल्या मार्गाला लागला. संत सावळाराम महाराजांनी आगरी समाजाला सन्मार्गाला लावण्याचे महान कार्य केले. त्यांचं नांव कल्याण ते शिळ या रस्त्यास दिलं याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.