डोंबिवलीत स्मशानभूमीतील पाणी गळतीमुळे नागरिक त्रस्त

( शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घेतली तात्काळ दखल )

डोंबिवली : पूर्वेतील शिवमंदिर रोडवर असलेल्या रामनगर मोक्षधाम स्मशानभूमीत मुसळधार पावसामुळे वरच्या छतावरून मोठया प्रमाणावर पाणी गळत आहे. परिणामी स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी सामोरे जावे लागत होते. पालिकेच्या अनागोंदी कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. या समस्येबाबत नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना तक्रार केली. मोरे यांनी ताबडतोब लक्ष देऊन यावर तोडगा काढला.अंत्यविधीसाठी लोक रामनगर स्मशानभूमीत आले असतांना तेथील पावसाने होणारी पाणी गळती लक्षात आली. पाणी गळतीमुळे तेथील बरेच लाकूड देखील ओले झालेले दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच याबाबत माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याचे सांगितले. स्मशानभूमीच्या आत जाताना गेटवर तुडुंब पाणी साचू लागले. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी स्वत: मोरे उभे राहून तेथील पाणी साचलेली समस्याही दूर केली. तसेच होत असलेली पत्रा गळती ताबडतोब दुरुस्त करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सुचना दिल्या. परिणामी सदर बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली असल्याने स्मशानभूमीतील समस्या ताबडतोब सोडवली जाईल अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. मात्र सदर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित ती निवारण केल्याबद्दल लोकांनी मोरे यांचे आभार मानले.