—- संस्थाध्यक्ष गुलाब वझे
डोंबिवली : पूर्वी समाजाला जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तोही आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुलं मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मनाने समाजाचे नांव मोठं करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे. आजचे यशस्वी विद्यार्थी हे देशासाठी रत्ने आहेत. संत सावळाराम महाराज यांचे आमच्या समाजावर फार मोठे उपकार आहेत. समाजाला एकत्र आणण्याच काम आगरी फोरम करीत आहे. आजचा आनंद मोठा आहे कारण एक गरीब कुटुंबातील योगेश सी.ए. झाला हे समाजासाठी अभिमानाचं आहे असे गौरवउद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.आगरी युथ फोरम,डोंबिवली यांच्या विद्यमाने सन २०२३ व २०२४ शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण पदवी,पदविका धारण केलेल्या शिवाय प्रावीण्य मिळवलेल्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच सत्कार समारंभ नुकताच होरायजोन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.