( नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांची घोषणा )
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत देऊन विजयश्री खेचून आणणारे तसेच सामान्य कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या आमदार राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण पाणीप्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार अशी घोषणाच केली. बुधवारी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात मतदार संघातील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करतांना पाणी प्रश्नांविषयी मोरे यांनी आपले मत स्पष्ट केले. यावेळी भेटीसाठी मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी मोरे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार राजेश मोरे यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

विधानसभा निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबईत होते. दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांनी आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांशी संवाद साधा आणि त्यांचे आभार माना अशा निरोपणे मोरे डोंबिवलीत आले. राजेश मोरे यांनी पदाधिकारी, शिवसैनिक आणि मतदार संघातील लोकांचा भेटी घेऊन मतदार संघातील समस्यांबाबत प्रत्येकाशी कौटुंबिक चर्चा केली. दरम्यान पत्रकारांनी मतदार संघातील प्रश्न मोरे यांच्यासमोर मांडले.

यावेळी आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रचारा दरम्यान लोकांनी त्यांच्या अनेक समस्या मांडल्या असून त्या कशाप्रकारे सोडविता येतील यांचा पूर्णपणे अभ्यास करून नियोजन केले जाईल. कल्याण ग्रामीण मतदार संघात मुख्य पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यावर भर देणार आहे. या विषयी अमृत योजने अंतर्गत काम सुरू आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आधीपासूनच प्रयत्न सुरू असून खासदार विकास कामे पूर्ण करण्यावर भर देत असतात. त्याचप्रमाणे पुढेही आता यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्रामीण विभागात स्वच्छता राखण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. मतदार संघातील दिवा वासियांचा रेल्वे प्रवास व्यवस्थित होण्यासाठी दिवा लोकल कशा पद्धतीने सुरू करता येईल परिणामी दिवा वासियांच्या रेल्वे प्रवास सुखरूप होईल. हे सर्व होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अनुभवाचा फायदा माझ्या मतदार संघातील लोकांना कसा मिळेल असे नियोजन करून मोठ्या प्रमाणावर विकासकामांवर भर देणार आहे. काही दिवसांत मतदार संघात फिरून लोकांच्या मुख्य काय मागण्या आहेत ते जाणून घेऊन कामाला महत्व देणार असेही सांगितले. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यावर भर देणार असून येथील सर्वच परिचयाचे असल्याने काम करणे सोपे जाणार आहे. ग्रामीण विभागातील अनेक भूमिपुत्रांनी नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे पुष्पगुच्छ, पुष्पहार देऊन गळाभेटही घेतली.