( आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून धावल्या शेकडो बसेस )
डोंबिवली : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी डोंबिवलीतून शेकडोच्या संख्येने शिवसैनिक निघाले. याकरिता आमदार राजेश मोरे यांनी शेकडो बसेसची व्यवस्था केली होती.

डोंबिवली तसेच विविध भागातून १०० बसेस मधून शिवसैनिक शपथविधी सोहळ्यासाठी दुपारी एक वाजता डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखे समोरून या बसेस आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाल्या.

यावेळी अक्षय सुर्वे (कल्याण ग्रामीण व डोंबिवली शहरप्रमुख मीडिया सेल, शिवसेना ),दिनेश शिवलकर (उपशहर प्रमुख), वैभव राणे (विभाग प्रमुख), संतोष तळाशिकर (उपशहर प्रमुख),विशाल पवार (शाखाप्रमुख), ओम वायंगणकर, सोमिल चिलसारीचा यांच्यासह शेकडो शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागील पंधरा दिवसापासून शपथविधी सोहळ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी यामुळे मिळाली आहे. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवसेना झिंदाबाद, एकनाथ शिंदे आगे बढो हम आपके साथ हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आगे बढो, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले, महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले त्याबद्दल प्रथम जनतेचे आभार मानतो. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दोन्हीही उपमुख्यमंत्री यांचाही शपथविधि होणार आहे. मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील तमाम शिवसैनिक महायुतीच्या कार्यकर्त्यांसह आम्ही जात आहोत. आज मोठ्या जल्लोषात आनंद सोहळा पार पडणार आहे.