डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कल्याण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदर जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.३० तर्फे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

सदर निधीच्या माध्यमातून पहिला टप्पा म्हणून नांदिवली पंचानंद प्रभागातील स्मशानभूमी रस्ता काँक्रीट करणे, वार्ड क्र. ११३ नांदिवली पंचानंद प्रभागातील गावदेवी मंदिर ते आनंदी बंगला ते बामणदेव मंदिर रस्ता काँक्रीट करणे आदी कामांसाठी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते रविवारी गावदेवी मंदिर नांदिवली, डोंबिवली पूर्व येथे पारंपरिक पद्धतीने भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी कल्याण जिल्हाध्यक्ष सुरेश जोशी, जिल्हा नियोजन समिती, ठाणे सदस्य अॅड. ब्रम्हा दिनेश माळी, शिवसेनेचे अर्जुन पाटील, प्रेमाताई म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, प्रेमनाथ ठाकुर, नासीर खान, हरिचंद्र देसले, सुरैय्या पटेल, उमेश पाटील, अनिल म्हात्रे, विकास देसले, रमेश पाटील, आकाश देसले, रोशन पाटील, सागर पाटील, रुपाली काळे आदी मान्यवरांसह जेष्ठ नागरीक, महीला व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, कल्याण ग्रामीणचे राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख ब्रह्मा माळी यांच्या प्रयत्नाने पाच कोटीचा निधी नगरविकास खात्याकडून आणण्यात यशस्वी झाले आहेत. नांदिवली विभागांमध्ये त्याच कामातील पहिला टप्प्याचे भूमिपूजन होत असून या कामासाठी ७० लाख निधी खर्ची होणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार आप्पा शिंदे यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महायुती सरकारचे सर्व नेत्यांनी या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. इलेक्शन म्हणून ही कामे होत नाही तर लोकांची गरज ओळखून कामे होत आहेत. येथील मतदार चांगले उमेदवार निवडून देतील अशी खात्री आहे. त्यामुळे नक्कीच महायुतीचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून येतील.
तर राष्ट्रवादीचे ब्रम्हा माळी म्हणाले, राष्ट्रवादी माध्यमातून आधारकार्ड शिबिर, मतदान नोंदणी, मेडिकल कॅम्प आदी समाजभूमुख कामे नेहमीच होत असतात. आमचे नेते आप्पा शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून नगर विकास खात्यांमधून हा निधी राष्ट्रवादीला दिलेल्या देण्यात आलेला आहे. त्यासाठी विशेष सहकार्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेले आहे. यामुळे आता नांदिवली, भोपर, शंखेश्र्वर विभागात मोठ्या प्रमाणावर पाच कोटी रुपयांच्या निधीमुळे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण माध्यमातून होणार आहेत. या विकासकामांमुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळतील.
