( डोंबिवली महिला महासंघ आयोजित परिसंवादात मान्यवरांचे वक्तव्य )
डोंबिवली : माणसामध्ये भीती वाढली की विवेक संपतो आणि त्याक्षणी भोंदूगिरी करणाऱ्यांचा प्रभाव वाढतो. या सर्वांना रोखायचे असेल तर तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक जागृती होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा मोठा वारसा आहे, अशा राज्यात वाढलेली भोंदूगिरी ही चिंताजनक आहे. याला आळा घालण्यासाठी तरुण पिढीला विश्वासात घेऊन तंत्र नव्हे तर तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचे धडे दिले पाहिजेत असे मत डोंबिवली महिला महासंघ आयोजित परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले.
भोंदूगिरी विरुद्ध जागर या विषयावर डोंबिवली महिला महासंघातर्फे जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे, मानसोपचार तज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुशीला मुंडे, कायतेतज्ञ अँड. तृप्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध जागरुक समाज घडविण्याचा उद्देश समोर ठेवून उपस्थित मान्यवरांनी अनेक मुद्दे मांडले. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी कायद्यावर विश्वास ठेवावा असे सांगून पिडीतांमध्ये महिलांची संख्या जास्त असते, कारण त्यांना कुटुंबातील अडचणीसाठी जबाबबदार धरले जाते. राग आणि भीती या दोन भावनांना महिला बळी पडतात, आणि त्याचाच फायदा भोंदूबाबा घेतात असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे यांनी महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे असे म्हणत अनेक भोंदूगिरी प्रकरणाविषयी खेद व्यक्त केला. म्हात्रे म्हणाले, समाजमाध्यमांमध्ये येणाऱ्या माहितीची पडताळणी झाली पाहिजे. यादव साम्राज्य काळात संत ज्ञानेश्वरांसह अनेक संतांनी जनजागृती केली. त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही, पण ही संस्कृती आता पुसली जात असल्याचे सांगितले. यासर्वातून बाहेर पडण्यासाठी आपली सांस्कृतिक मुळं अधिक घट्ट करण्याची गरज आहे.

तर कायतेतज्ञ अँड. तृप्ती पाटील यांनी भोंदूगिरी विरोधात असलेल्या कायद्याची माहिती उपस्थितांना दिली. या सर्व प्रकरणात बहुधा महिला बळी ठरतात. पण कायदा हा आपला मित्र आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा असे सांगीतले.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुशीला मुंडे यांनी सांगितले की, भोंदूगिरी विरोधात लढा देण्यासाठी तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवला पाहिजे. यासाठी शाळांमधून अभ्यासवर्ग चालवण्याची गरज आहे. तर मानसोपचार तज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी आपली सदविवेक बुद्धी जर शाबुत असेल तर अशा भोंदूबाबांचा कधीही आपल्यावर प्रभाव पडू शकत नाही. कुठल्याही गोष्टीबाबात चिकित्सक वृत्ती हवी. आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत अगदी आपल्या गुरुलाही प्रश्न विचारा.
महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष आणि कार्यवाह सीए जयश्री कर्वे आणि शुभांगी मगर यांनी या परिसंवादामध्ये मान्यवरांबरोबर संवाद साधला.
या परिसंवादापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी उपस्थितांनी काही प्रात्याक्षिके दाखवली. त्यांनी पैशाचा पाऊस कसा पडतो हेही दाखवून भोंदूबाबा कशाप्रकारे फसवणूक करतात, हे सांगितले. तसेच भोंदू बाबा समोरच्या व्यक्तीला फसवण्यासाठी कशाप्रकारे हातचलाखी करतात, हेही सांगितले. डोंबिवली महिला महासंघाच्या अध्यक्षा डॉ. विंदा भुस्कुटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत भावनिकतेला बळी पडू नका असे आवाहन केले.
यावेळी मीना गोडखिंडी, सुवर्णा राणे नगरसेविका रंजना पेणकर, नगरसेविका ज्योती मराठे, नगरसेविका डॉ. रसिका पाटील, माजी महापौर अनित दळवी, डॉ. वर्षा जोशी, उपाध्यक्षा नेत्रा फडके, कार्यकारिणी सदस्य संगिता देशपांडे, सई बने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जोया पाटील यांनी केले. प्रास्ताविक महासंघाच्या कोषाध्यक्षा सुनीति रायकर यांनी केले.

